एमजीएम विद्यापीठातर्फे ‘एही पस्सिको’ संगीत प्रस्तुतीचे आयोजन
विपस्सनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या निवडक दोह्यांचे प्रथमच होणार सांगीतिक सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर : विपस्सनेच्या माध्यमातून मानवी दुःखाचे मूळ कारण शोधून त्याचे निर्मूलन करण्यासाठी कल्याणमित्र सत्यनारायण गोयंका यांनी अहोरात्र, निष्ठापूर्वक आणि यशस्वी प्रयत्न केले. आज त्यांच्या विपस्सना कार्याचा परीघ संपूर्ण जगाला व्याप्त करून घेत आहे. समस्त मानवांसाठी त्यांनी केलेले हे प्रामाणिक प्रयत्न उत्तम मंगलाचे कारण ठरत आहेत. शिबिरातील प्रत्यक्ष साधनेबरोबरच त्यांनी रचलेल्या मार्मिक दोहयांनीदेखील समाज मनामध्ये चैतन्य फुलविण्याचे आणि जीवनपथावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी अशी भूमिका निभावली आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून जगभर साजरे केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून एमजीएम विद्यापीठाच्या वतीने आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या जन्मदिनी म्हणजेच दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात त्यांच्याच स्व:रचित निवडक दोहयांची संगीतमय प्रस्तुती करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिनेश वकील यांच्या शुभ हस्ते होणार असून स. भु. शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्रोफेसर संजय मोहड यांनी या विशेष संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली असून विद्यार्थीवृंद आणि वादक कलावंत ही संगीत प्रस्तुती करणार आहेत. यात डॉ. संजय मोहड यांच्याबरोबर मेधा लखपति,विद्या धनेधर,वैष्णवी लोळे, पूनम साळवे आणि सलोनी जुंबडे या विद्यार्थीनी कलावंत सत्यनारायण गोयंका यांचे निवडक दोहे सादर करणार आहेत. तसेच रोहन शेटे , पुणे (तबला), अनुप कुल्थे, पुणे (व्हायोलिन), निरंजन भालेराव (बासरी), राहुल जोशी (सहतालवाद्य), बंकट बैरागी (पखवाज) यांची साथसंगत असणार आहे. या संगीत प्रस्तुतीचे आशयगर्भ निरूपण डॉ. संजय मोहड हे करणार आहेत.
समाजाच्या मानसिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी एमजीएम विद्यापीठाने यापूर्वी ‘त्रीसरण-पंचशील’, ‘नादविधान’, ‘वंदन माणसाला’, ‘मन वढाय वढाय’, ‘स्वरफुलोरा’, ‘कुळवाडी भूषण’, ‘मूकनायक’, ‘धम्मपद’, ‘वीतराग’, ‘पीर पर्बत-सी’ अशा ऐतिहासिक, समाजाभिमुख, आशयसंपन्न आणि तत्वज्ञानाने ओत-प्रोत असलेल्या संगीत मैफलींचे आयोजन केले आहे. या सर्वच उपक्रमांना जाणकार श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. या प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन एमजीएम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी केले आहे.