गोंडवाना विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
गडचिरोली : आपल्या आजूबाजूचे देश बघितले तर या देशांमध्ये लोकशाहीचा मागमूस दिसत नाही. यापैकी काही देशांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली असेल पण लक्षात घ्यायला हवे की, १४० कोटी लोकांचा समूह सोबत घेऊन विकासाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत तो टप्पा आपण लोकशाहीचे पालन करून गाठलेला आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे भारतीय समाजाचे विशेषत्वाने आपण कौतुक केले पाहिजे.
गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण अजूनही अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा गंध नाही. त्यांना विद्यापीठ, महाविद्यालय असतं हे देखील माहिती नाही अशा लोकांपर्यंत आपल्याला शिक्षण पोहोचवायचा आहे असं ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पदमविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी ते म्हणाले, आजच्या शुभ दिनी पुढच्या वाटचालीत आपल्याला यश मिळेल .आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण होवो. भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून पुढे येवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण , अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे , अधिष्ठाता मानवविज्ञानविद्या शाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, परीक्षा संचालक दिनेश नरोटे यांच्यासह अधिकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
संचालन आणि आभार मराठी विभागाचे स. प्रा. डॉ. हेमराज निखाडे यांनी मानले.