उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आऊटरिच प्रोग्राम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने “आऊटरिच प्रोग्राम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरूवार दि. २५ जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी डॉ. शिल्पा सावंत व मंगेश मालुसरे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, समन्वयक प्रा. रमेश सरदार, डॉ. उज्जवल पाटील, डॉ. नवीन दंदी मंचावर उपस्थित होते. यावेळी वैज्ञानिक अधिकारी यांनी भारताच्या अणु ऊर्जेची अफाट क्षमता आणि वीज निर्मिती तसेच इंधन सामुग्रीचा विकास आणि भारताला भविष्यात लागणारी ऊर्जा, आण्विक कच-याची सुरक्षित विल्हेवाट, उद्योग, औषध आणि कृषी क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञान यामध्ये भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या योगदानाबद्दल माहिती दिली. हे केंद्र इंजिनिअरींग, मेकॅनिकल, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पूटर व फिजिकल सायन्स या विषयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी तर सुत्रसंचालन विद्यार्थी तय्याब पटेल याने केले. आभार निकिता पाटील हीने मानले.