शिवाजी विद्यापीठात आयोजित ”हवामान बदल आणि प्रसारमाध्यमे” या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
कोल्हापूर : जागतिक हवामान बदलामुळे मानवासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मानवाने पर्यावरण पूरक जीवन पद्धती अवलंबणे अपरिहार्य आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित हवामान बदल आणि प्रसारमाध्यमे या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंडियन एक्सप्रेसचे सहाय्यक संपादक पार्थसारथी बिस्वास, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. शिर्के म्हणाले, वातावरण बदलाचा विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम विचारात घेता शिवाजी विद्यापीठाने वातावरणीय बदलांचा अभ्यास करणारे केंद्र सुरू केले आहे. प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये असे केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. अशा केंद्रातून हवामान बदलाविषयी जाणीव जागृती आणि संशोधनाच्या मदतीने या समस्येची तीव्रता कमी करणे शक्य होईल. पर्यावरण संवर्धनाचे अनेक चांगले उपक्रम होत आहेत. या उपक्रमांची प्रसारमाध्यमांनी दखल घेऊन सकारात्मक माहिती सर्व दूर पोहोचवावी. प्रसार माध्यमे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी कामगिरी करू शकतात, असे मत प्रा. शिर्के यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पर्यावरणाविषयीचे भान शालेय जीवनापासूनच येणे आवश्यक आहे. शालेय स्तरापासून महाविद्यालयापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली तर पर्यावरणाची हानी टाळता येऊ शकेल. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच वेब माध्यमांच्या सहाय्याने विविध तंत्राचा वापर करून पर्यावरणीय संदेश जनमाणसापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी माध्यमांवर आणि पत्रकारांवर येऊन ठेपली आहे.
प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार मोहसीन मुल्ला यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रेषित शहा आणि पार्षद शहा या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्लास्टिक ब्लॉक या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग यावेळी करण्यात आले. या शॉर्ट फिल्मबद्दल पार्षद शहा या विद्यार्थ्यांचा सत्कार कुलगुरू प्रा. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निसर्गमित्र संस्थचे अध्यक्ष अनिल चौगले, ए. आय. बागवान, संजय घोडावत विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे जयप्रकाश पाटील, सहयोगी शिक्षक अभिजीत गुर्जर, जयसिंग चव्हाण, तसेच एमएसडब्ल्यू, पर्यावरणशास्त्र विभाग आणि क्लायमेट चेंज केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राधिका शर्मा हिने सूत्रसंचालन केले. सुरज कांबळे याने आभार मानले.