स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘दिग्दर्शन व नाट्यतंत्र’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप
कलेचा उपयोग लोक शिक्षणासाठी व्हावा – मा. विनोद रापतवार
नांदेड : नाटक व इतर कलांचा उपयोग लोक शिक्षणासाठी व्हावा, असे मत जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यत्क केले आहे. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्यावतीने ‘दिग्दर्शन व नाट्यतंत्र’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कला व कलावंतांनी बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचाही लोक शिक्षणासाठी प्रभावी वापर करावा. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अशा प्रकारच्या प्रात्यक्षिक कार्यशाळा या विद्यार्थ्यांमधे आत्मविश्वास निर्माण करतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेच्या अपर्णा नेरळकर, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, सुरेश जोंधळे, डॉ. महेश जोशी व प्रा. कैलास यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यशाळा दि.२३ व २४ जानेवारी दोन दिवस चालली, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रचे प्रा.डॅा. दिपक गरुड यांनी दोन्ही दिवस सहभागी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे आजी-माजी विद्यार्थ्यी डॉ. राम चव्हाण, गोविंद जोशी, दिनेश कवडे, राहुल जोंधळे, विजय गजभारे आदींचा विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. वेळी नाट्य व चित्रपट विभागाचे डॉ. अनुराधा पत्की, प्रा. अभिजित वाघमारे, प्रा. बोम्पीलवार, प्रा. सावंत, एन. व्ही. गायकवाड व संकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कैलाश पोपुलवाड यांनी केले तर आभार प्रा.राहुल गायकवाड यांनी मानले.