देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबीराचा समारोप
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चित्तेगाव याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर संपन्न झाले. हे शिबीर दि. १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत म.शि. प्र. मंडळ व्यवस्थापन व प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराच्या समारोप समारंभासाठी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद भिंगारे व रमेश औताडे हे उपस्थित होते. महाविद्यालयातील रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. भाऊसाहेब शिंदे यांनी या शिबिराचे अहवाल वाचन केले तर प्रा. माणिक भताने यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.

या प्रसंगी बोलताना प्रमुख मार्गदर्शक शरद भिंगारे सर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तवणुकीत सकारात्मक बदल होतात. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सक्रीय पणे सहभागी होऊन आपल्या व्यक्तमत्वाचा विकास करून घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमाबरोबरच महापुरुषांच्या जिवनावर आधारित पुस्तके वाचायला हवी. महापुरुषांच्या जिवनचरित्राच्या अभ्यासातून त्यांनी कशा पद्धतीने विविध समस्यांना तोंड दिले हे समजते. याप्रसंगी बोलताना डॉ. रमेश औताडे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही अनौपचारिक शिक्षणाची कार्यशाळा आहे. रा. से. योजनेत विद्यार्थ्यांना समाजाचे आकलन होते. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य अशोक तेजनकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना या शिबिरात तुम्ही सात दिवस श्रमदान केले, विविध तज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने ऐकली यातून तुम्हाला निश्चित चांगले विचार मिळाले असेल. श्रमदान करतांना अनुभवात्मक शिक्षण घेतले. स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांचा अभ्यास करून ग्रामस्थांची जनजागृती केली पाहिजे. जल व्यवस्थापण व जलसंधारण याविषयी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कार्यप्रवण झाले पाहिजे. नविन शैक्षणिक धोरण २०२० नुसार राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे मुल्यशिक्षण देण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या ७ दिवशीय शिबिरात झालेल्या विविध कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रा. से. यो. गावकऱ्यांच्या वतीने ह.भ.प. रंगनाथ महाराज गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या ७ दिवसीय शिबिरात आलेले अनुभव स्वयंसेवक आबेद शेख आणि सचिन मापारी यांनी कथन केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरणार, डॉ. अनिल आर्दड, डॉ. अपर्णा तावरे यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी , डॉ. गणेश मोहिते, उपसरपंच मंगेश गावंडे, राहुल वाघमारे, उमेश गावंडे, प्रविण तिदार, शाम बंसल, सचिन ढोले, प्रा. माणिक भताने, डॉ. रंजना चावडा कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा पाटील, गणेश वाघमारे, बनकर, गावातील शिक्षक, पदाधिकारी, ग्रामस्थ व १५० स्वयंसेवक आदींची उपस्थिती होती. या शिबिरात श्रमदानाबरोबरच, विविध विषयांवर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, मतदार जागृती, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी प्रतिबंध, जल व्यवस्थापन आदी विषयांवर विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत कनगरे यांनी केले तर प्रा. माणिक भताने यांनी आभार मानले.