मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे भव्य उदघाटन
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साठाव्या स्मृतिवर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सावरकरांसह अनेक थोर क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या विभूतींचे कार्य नवीन पिढीपुढे यावे, हीच आजच्या केंद्र स्थापनेची गरज आहे.” त्यांनी सावरकरांचे व्यक्तिमत्व ज्वलंत राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून ओळखले व त्यांच्या विचारांचे सावरकर सर्किट तयार करण्याची सूचना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला निधीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन देत सांगितले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्ती नव्हते, तर संस्था होते. त्यांचे जीवन संशोधनासाठी अथांग आहे.” त्यांनी अंदमानमधील काळकोठडीचा उल्लेख करून सावरकरांच्या दुर्दम्य आत्मबलाचे उदाहरण दिले. सावरकरांचे सामाजिक समरसतेचे कार्य, जातीभेद विरोध, आणि भाषाशुद्धीचे योगदान देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘अनादि मी अनंत मी’ या गीताला प्रदान केल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, तसेच अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नितीन आरेकर यांनी केले.
मुंबई विद्यापीठात सुरु झालेल्या या अभ्यास व संशोधन केंद्रामुळे सावरकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.