डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विविध ठराव मंजूर
’युवक महोत्सव’चे जिल्हानिहाय आयोजन
’कोहिनूर’वर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून चारही जिल्हयात स्वतंत्रपणे ’युवक महोत्सव’चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कोहिनूर शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि २६) सकाळी ११ः३० ते तीन या दरम्यान बैठक झाली. बैठकीस प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह १९ सदस्य उपस्थित होते. बैठकीत २४ प्रस्तावावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात आले.
१) केंद्रीय युवा महोत्सव सल्लागार समितीच्या जानेवारी २०२५ मध्ये पाठविण्यात आलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या.
यानूसार प्रत्येक संलग्नित महाविद्यालयांचे किमान दोन संघ कलाप्रकारात सहभागी होण्याबाबत बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय लोककला युवक महोत्सव स्वतंत्र घेण्याबाबत आणि युवा महोत्सव जिल्हानिहाय घेण्याबाबत मान्यता देण्यात आली. केंद्रीय पध्दतीने विद्यापीठ स्तरावर चारही जिल्हयातील महाविद्यालयांचा एकत्रित लोककला महोतसव नामविस्तार दिनापूर्वी घेण्यात येणार आहे.
या संदर्भात गेल्या वर्षीच्या युवक महोत्सवात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी स्वतंत्र लोककला महोत्सव घेण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने सल्लागार समितीच्या शिफारसीनूसार विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे तथा सदस्य सचिव यांनी हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.
२) कोहिनूर शिक्षण संस्था संचलित, कोहिनूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खुलताबाद या महाविद्यालयासंदर्भात डॉ भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालानूसार सदर महाविद्यालयाकडून खुलासा मागविण्यात आला. सदर बाबतचा खुलासा अद्याप प्राप्त झाला नाही. कोहिनूर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व नियमित प्राचार्य उपलब्ध नसल्यामुळे व महाविद्यालयातील कामकाजासंदर्भात अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ व चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्यामुळे तेथील कर्मचारी व विद्यार्थी यांच्या दैनंदीन कारभारात अडचणी येत आहेत. या सर्व बाबीचा विचार करता सदर संस्थेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली.
३) साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, चिकलठाण ता कन्नड जि छत्रपती संभाजीनगर हे महाविद्यालय आसावा ब्रदर्स छत्रपती संभाजीनगर या संस्थेकडे हस्तांतरण करण्याबाबतचा (स्थळ बदलण्यास परवानगी देण्यात येणार नाही या अटीसह) प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यात आला. या संदर्भात शिफारस करण्यासाठी प्र-कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
४) मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ करिअर एज्युकेशन मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयाचे नाव बदलून मातोश्री श्रीकंवर महाविद्यालय, असा नावात बदल करण्यात मान्यता देण्यात आली.
५) विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाच्या पीठासीन आधिका-यास व त्यांच्या दिमतीला असलेल कर्मचारी वर्गास अनुज्ञेय असलेले परिश्रमिक, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी, अंशदान, रजा भत्ता आणि इतर भत्ते व सोयी यासाठी होणारा सर्व खर्च नांदेड, जळगांव व छत्रपती संभाजीनगर येथील तीन विद्यापीठांनी मिळून त्यांच्या संलग्नीत महाविद्यालयांच्या संख्येनूसार विभागणी करुन विद्यापीठ निधीतून करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
विविध समित्या स्थापन
या बैठकीत विविध विषयासंदर्भात चार समित्या स्थापन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यामध्ये विद्यापीठ परिसरातील निवासस्थान वाटपाचे निकष, घरभाडे भत्ता व अन्य बाबी संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी डॉ गजानन सानप यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली. वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड सदस्य सचिव राहतील.
महाविद्यालयाचे हस्तांतरण करण्यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.
’पेट’ परीक्षेसंदर्भात त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी डॉ श्याम सिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदशीय समिती स्थापन करण्यात आली. तर विद्यापीठ गेस्ट हाऊस संदर्भात डॉ अंकुश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदसीय समिती गठीत करण्यात आली. प्रभारी अधिकारी डॉ कैलास पाथ्रीकर हे समितीचे सदस्य सचिव राहतील. या बैठकीत एकुण २४ प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. सामान्य प्रशास विभागाचे डॉ कैलास पाथ्रीकर, संजय लांब व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
कुलगुरुंच्या अभिनंदनाचा ठराव
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी वार्षिक परीक्षेच्या काळात अनेक केंद्राना भेटी दिल्या. योग्य त्या सूचना केल्या. आगामी काळात परीक्षेत पारदर्शकता होण्यास मदत होईल. त्याबद्दल प्राचार्य डॉ भारत खंदारे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. डॉ गजानन सानप यांनी त्यास अनुमोदन दिले. तर केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेची ’कर्नल कमांडट’ उपाधी जाहीर झाल्याबद्दल डॉ गजानन सानप यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. डॉ अंकुश कदम यांनी अनुमोदन दिले. दोन्ही प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.