श्री जून्नेश्वर विद्यालयात बालविवाह प्रतिबंध जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
वरुड (काजी)/ छत्रपती संभाजीनगर : समाजामध्ये सध्या मुलगा- मुलगी असा भेदभाव कमी झाला असला तरीसुद्धा मुलींवर थोडी जास्तीची जबाबदारी असते. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत मुली शिक्षण शिकत असतात. मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करणे गरजेचे असून ध्येय निश्चितीसह शिक्षणाच्या पूर्ततेशिवाय थांबणे नाही, हा दृढनिश्चय करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी यावेळी केले. एमजीएम रेडिओ ९०.८ एफएम, युनिसेफ व स्मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध जनजागृती उपक्रमांतर्गत वरुड (काजी) येथील श्री. जून्नेश्वर विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ७ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी, मार्गदर्शक म्हणून एमजीएम विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. हनुमंत सोनकांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव, एमजीएम रेडिओ,९०.८ एफएमचे केंद्र प्रमुख सुनिल शिरसीकर,प्रा. विशाखा गारखेडकर, प्राचार्य निवृत्ती वायाळ व शेखर पाटील दांडगे व्यासपीठावर उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव म्हणाल्या, अजूनही दहावी झाली की मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू होते. मात्र, मुलींनी आपल्या पालकांना विश्वास देत आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. आपल्या परिसरात जर बालविवाह होत असेल तर पोलिसांना संपर्क साधत नागरिक १०९८ या हेल्पलाईन चाही वापर करू शकतात.
समकालीन काळामध्ये आपले खरे आदर्श ओळखण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसामोर आहे. मात्र, पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला आपले आदर्श मिळू शकतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात आपण करीत असलेल्या मेहनतीमुळे आपल्या भविष्याची दिशा ठरत असते. आपले ध्येय निश्चित करीत त्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याने आपल्याला अपेक्षित यश मिळविता येते, असे डॉ.हनुमंत सोनकांबळे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव म्हणाल्या, शासनाने मुलींच्या जन्मापासून तिच्या लग्नापर्यंत विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ घेत मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करावे. शिक्षणाला प्राधान्य देत अगोदर शिक्षण आणि नंतर लग्नाचा विचार करणे आवश्यक आहे.
बालविवाह प्रतिबंध घोषणा देत प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंध पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जून्नेश्वर विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती वायाळ यांनी केले तर एमजीएम रेडिओ ९०.८ एफएमचे केंद्र प्रमुख सुनील शिरसीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे अदनान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर जे मनीषा, आर जे भूषण, आणि शाळेतील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञेने करण्यात आली.