नागपूर विद्यापीठाचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोबत सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्यासह स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता कौशल्यासह स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. याकरिता विद्यापीठाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यासोबत बुधवार, दि १६ एप्रिल २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

विद्यापीठाच्या सभाकक्षात सामंजस्य कराराचे (MoU) हस्तांतरण करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), कुलसचिव डॉ राजू हिवसे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे, अधिसभा सदस्य डॉ किशोर इंगळे, प्रथमेश फुलेकर, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ विजय खंडाळ, इंक्युबेशन केंद्र संचालक डॉ अभय देशमुख, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी दिग्विजय जामदार, जिल्हा समन्वयक अधिकारी कौस्तुभ नंद, लघु लेखक कुणाल पवार यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागांतर्गत कार्यरत आहे. या करारामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रामार्फत प्रयत्न केले जातील.
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या कौशल्य घटकांचा लाभ घेणे, तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी कौशल्य विकासाचे अल्पकालीन प्रशिक्षण देणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध कौशल्य अभ्यासक्रमांसाठी योग्य प्रमाणात श्रेयांक (क्रेडिट्स) प्रदान करण्यात येणार असून, ते अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये हस्तांतरितही करण्यात येतील. या करारामुळे विद्यापीठ परीक्षेत्रातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास यावेळी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी व्यक्त केला.