राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सामाजिक समरसतेच्या राष्ट्र संकल्पनेवर भर

नागपूर : 14 एप्रिल 2025 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक समरसतेवरील राष्ट्र संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुख्य व्याख्याते म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पाचपोर यांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, “डॉ. आंबेडकर यांना वाचल्याशिवाय त्यांना समजणे अशक्य आहे.” त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर आंदोलन, संविधान निर्मितीतील योगदान, जल व पर्यावरण संवर्धनावरील भूमिका, तसेच संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा प्रस्ताव यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भारतीय संविधानाला “माणुसकीचा धर्मग्रंथ” असे संबोधित करत सर्व नागरिकांनी संविधानाचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांनी विद्यापीठ मोबाईल अ‍ॅप, हातमाग उत्पादनांवरील विशेष माहिती, तसेच ई-मासिकाच्या लोकार्पणाबाबत माहिती दिली.

Advertisement

कार्यक्रमात भारतीय संविधान निर्मितीवरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, डॉ. आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण, आणि ई-मासिकाचे प्रकाशन या उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण रंग भरले. सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भरविण्यात आलेली छायाचित्र प्रदर्शनी विद्यापीठाच्या विविध इमारतींत १९ एप्रिलपर्यंत खुली राहणार आहे.

प्रमुख उपस्थितीमध्ये कुलसचिव डॉ. राजू हिवसे, डॉ. समय बनसोड, सहसचिव समर नंदा, डॉ. विजय खंडाळ, डॉ. रविशंकर मोर, आणि विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रविशंकर मोर, संचालन डॉ. अमृता इंदूरकर आणि आभार प्रदर्शन डॉ. राजू हिवसे यांनी केले.

या प्रेरणादायी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांना आचरणात आणण्याची प्रेरणा घेतली, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page