एमजीएम विद्यापीठात ‘विकसित भारत युवा संसदे’चे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उद्घाटन संपन्न
तरूणाईने ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विषयावर व्यक्त केले आपले विचार
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत युवा संसदेचे उद्घाटन रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्राचे सचिव नीलेश राऊत, जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, प्रा डॉ ह नि सोनकांबळे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ आर आर देशमुख व सर्व संबंधित उपस्थित होते.







यावेळी बोलताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ म्हणाले, ही जारी एक स्पर्धा असली तरी विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या देशाची इतर देशांची तुलना करत असताना विद्यार्थ्यांनी हाही विचार करणे आवश्यक आहे की, आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो. तरुणाईचे विचार जेंव्हा कृतीमध्ये उतरतात त्यावेळी त्यांचे ते समाजासाठी एक योगदान असते. सन २०४७ मध्ये आपला देश विकसित भारत होणार असून सर्वांनी यास्तव आपल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संसदेत तसेच राज्यातील विधानसभेत त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स यांच्यामार्फत जिल्हास्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची संधी एमजीएम विद्यापीठास मिळाली आहे.
मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा संसद’ हा जो उपक्रम राबविला जात आहे, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक प्रकारे संसदेत ज्या प्रकारे आपले लोकप्रतिनिधी आपल्या भागाचे नेतृत्व करत तिथे प्रश्न मांडतात अगदी त्याचप्रमाणे या भागातील तरुणाईस संसदेस भेट देता येणार आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अशा प्रकारच्या महत्वपूर्ण विषयांवर विद्यार्थी व्यक्त होत होणार आहेत.
विशेषत: आजच्या तरुणाईने राष्ट्रीय युवा धोरण आणि महाराष्ट्र युवा धोरण याचाही अभ्यास विद्यार्थ्यानी करणे आवश्यक आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एमजीएम विद्यापीठाची या स्पर्धेच्या आयोजनासाठी नोडल एजन्सी म्हणून निवड होणे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यावेळी बोलताना म्हणाले की, देशाच्या भविष्यावर प्रभाव टाकणाऱ्या राष्ट्रीय प्रश्नांवर तरुणांना मते मांडण्याची संधी मिळावी आणि त्यांची नेतृत्व क्षमता विकसित व्हावी, यासाठी ‘विकसित भारत युवा संसद २०२५’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी युवकांनी ‘व्हॉट डू यू मीन बाय विकसित भारत?’ या विषयावर १ मिनिटाचा व्हिडिओ माय भारत वर अपलोड केला होता. या स्पर्धेत एकूण १७८ विद्यार्थ्यांमधून १५० विद्यार्थी जिल्हा फेरीसाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर आज आणि उद्या आपले विचार यावेळी व्यक्त करणार आहेत.
आज झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आरती साळुंके यांनी केले तर आभार डॉ आर आर देशमुख यांनी मानले.