प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी रोहन लाखे नेट परीक्षा उत्तीर्ण
कोल्हापूर : आई घरची धुणी-भांडी करणारी तर वडील गवंडी काम करणारे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरातील राजेंद्रनगर वस्तीतील रोहन लाखे हा भरपूर अभ्यास व मेहनतीने प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक तबला या विषयातील राष्ट्रीय नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे रोहन हा पूर्णपणे अंध विद्यार्थी आहे. हे नैसर्गिक अपंगत्व कुठेही आड न आणता वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्याने संगीताचे धडे‘ ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंधशाळा, कोल्हापूर येथील त्याचे पहिले गुरु गौतम कांबळे यांच्याकडे गिरविले. हा प्रवास असाच पुढे चालू ठेवत त्याने हार्मोनिअम या वाद्यात संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे डिप्लोमा पूर्ण केला. हार्मोनिअमचे मार्गदर्शन त्याला संदीप तावरे व अमित साळोखे यांच्याकडून लाभले आहे.
हार्मोनिअम या वाद्याबरोबरच रोहन याने तबलाया विषयात विशारदही पूर्ण केले आहे. यासाठी त्याला कोल्हापूरातील प्रसिद्ध तबला वादक प्रदीप कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या तो शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागामध्ये एम. ए. भाग दोन करीता तबला या वाद्याचे शिक्षण घेत आहे. त्याला विभागप्रमुख डॉ. निखील भगत तसेच डॉ. सचिन कचोटे व प्रशांत देसाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तबला, हार्मोनिअम या वाद्यांबरोबर ढोलक, ढोलकी, की-बोर्ड ही वाद्येही रोहन अतिशय सफाईने वाजवितो.शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात रोहनला तबला वादनात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचबरोबरन्याशनल असोसिएशन फॉरब्लाइंडव न्याशनल फेडरेशन फॉर द ब्लाइंडतर्फे आयोजित विविध सांगीतिक स्पर्धांमध्येही त्याला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाचे शिवाजी विद्यापीठाकडून रोहन लाखे यांचे कौतुक करण्यात आले.