राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ज्येष्ठ नागरिक महामंडळ सोबत सामंजस्य करार
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी रासेयोचा पुढाकार
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना विविध स्वरूपात मदत करता यावी म्हणून विद्यापीठाने ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूर सोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष प्रा प्रभुजी देशपांडे, सचिव ॲड अविनाश तेलंग, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ सोपानदेव पिसे यांची यावेळी उपस्थिती होती.
सामंजस्य करारानुसार ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे सहकार्य करणे. त्यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या कार्यक्रमात कुलगुरू यांच्या परवानगीने सहभागी होणे. ज्येष्ठ नागरिक मंडळाला सक्षम करण्यास सहकार्य करून उपयुक्तता वाढविणे. वृद्ध व वृद्धत्व यांच्या समस्यांचे संशोधन केंद्र निर्मितीत सहकार्य करणे. शारीरिक, मानसिक समस्या सोडविण्यात मदत करणे. प्रबोधनात्मक व समाजजागृती कार्यशाळा व भजन, कीर्तन, उत्सव, क्रीडा, मनोरंजन, प्राणायाम योगा आदी कार्यक्रमाबाबत आवश्यक मदत करणे.
ज्येष्ठांशी संबंधित मंडळ सोबत समन्वय साधने. समग्र नागपूर भर ज्येष्ठ नागरिक मंडळाचा प्रचार-प्रसार व सहकार्य करणे. विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये रासेयोद्वारा मदत करणे. संयुक्तरित्या सकारात्मक प्रकल्प सुरू करताना मदत करणे. वृद्धांच्या शारीरिक, मानसिक व्याधी समजून घेऊन शक्य ती मदत करणे.जिल्हानिहाय जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक मंडळाला आर्थिक मदत झाल्यानंतर त्यांच्या प्रकल्पात सहकार्य करणे आदी मदत करण्याबाबत महत्वपूर्ण कार्य राष्ट्रीय सेवा योजना करणार आहे.