“खेलो इंडिया” स्पर्धेसाठी संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पुरुष संघ पात्र
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या संघाची दमदार कामगिरी
अमरावती : गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यापीठाच्या पुरुष संघाने फॉइल या स्पर्धा प्रकारात चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या आधारावर हा संघ खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात आदेश डोंगरे, पी.जी. टी. डी. शारीरिक शिक्षण विभाग, सचिन जंगले, डी.सी.पी. ई. अमरावती, जीवक खंडारे, स्व. पुष्पलतादेवी पाटील महा. रिसोड, इरफान शेख, भारतीय महाविद्यालय, मोर्शी यांचा समावेश होता. चुरशीच्या स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी अनेक नामांकित संघाना पराभूत करून अतिशय उत्तम कामगिरी केली.
संघाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण राजरत्न कांबळे, अमरावती यांनी, तर व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाने डॉ. सुधीर खाडे, स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन यांची नियुक्ती केली होती. संघाच्या या चमकदार कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय महेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा संचालक, डॉ. अविनाश असनारे, क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.