राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इनक्यूबीन फाउंडेशनचा इम्मवर्स एआय सोबत सामंजस्य करार
विद्यापीठात होईल एआय (AI) स्टार्टअप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे स्टार्टअप निर्माण होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये विख्यात असलेल्या इम्मवर्स एआय सोबत विद्यापीठाच्या इनक्यूबीन फाउंडेशनने सामंजस्य करार (MoU) केला आहे. त्यामुळे एआय आधारित नवीन संकल्पनांना चालना मिळणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडविणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान (AI) हाताळण्यात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत. विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम ठरावे म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अभ्यासक्रम, स्टार्टअप सुरू करण्यास प्रोत्साहित केले होते. विद्यापीठाच्या इन्क्युबिन फाउंडेशनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नामांकित असलेल्या इम्मवर्स एआय नागपूर-युएस यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे.
कुलगुरू कक्षात करार (MoU) हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, इम्मवर्स एआयचे संस्थापक रामक्रिष्णन रामा, सीओओ प्रीती रामक्रिष्णन, आयआयएल प्रभारी संचालक डॉ निशिकांत राऊत, इन्क्युबिन फाउंडेशनचे संचालक डॉ अभय देशमुख, इन्क्युबिन सेंटरच्या सीईओ प्रियंका राजावत व त्यांची टीम उपस्थित होती.
या सामजस्य करारामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आधुनिक अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमात शिक्षण घेणे तसेच नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी प्राप्त होणार आहे. सर्वांसाठी एआय तसेच ऑनलाईन आणि ऑफलाइन अभ्यासक्रम देखील सुरू केले जाणार आहे. अभ्यासक्रम तसेच स्टार्टअप सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डेटा सेंटर तसेच अन्य उपक्रम या एमओयूच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.