सोलापूर विद्यापीठात ‘उपचारात्मक योग’ विषयावर शनिवारी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुलामार्फत पीएम-उषा योजनेतंर्गत उपचारात्मक योग या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्या सभागृहात करण्यात आल्याची माहिती आरोग्य संकुलाचे समन्वयक डॉ अभिजीत जगताप यांनी दिली.

आरोग्य विज्ञान संकुलांतर्गत योगशिक्षक पदविका आणि एम ए योग हे योगविषयक अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे योगशास्त्राच्या प्रसाराचे कार्य चालू आहे. सदर अभ्यासक्रमांना शहरातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून आधुनिक जीवनशैली संबंधीत शारीरिक व मानसिक व्याधींवर प्रभावी योगोपचाराविषयी माहिती मिळावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग विषयात होत असलेल्या संशोधनाविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी आरोग्य विज्ञान संकुलामार्फत एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत महिलांचे आरोग्य, ताणतणाव नियंत्रण, मानसिक स्वास्थ यासाठी ‘उपचारात्मक योग’, ‘मेडिकल योग’ आणि ‘योगमधील संशोधन’ या विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. कार्यशाळेसाठी नोंदणी शुल्क रु १०० असून कार्यशाळा ही सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी खुली ठेवण्यात आली आहे. कार्यशाळेचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संकुलाचे समन्वयक डॉ अभिजीत जगताप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा डॉ शालिनी मस्के (७७२२०३६८७६) आणि प्रा तृप्ती आवताडे (७०२००६५३२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.