राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पथकाने मध्य प्रदेशातील आदिवासी संग्रहालयास दिली भेट
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नव्याने आदिवासी संग्रहालय निर्माण केले जाणार आहे. विद्यापीठात निर्माणाधिन आदिवासी संग्रहालय कसे असावे याकरिता विद्यापीठातील पथकाने मध्य प्रदेशातील विविध आदिवासी संग्रहालयांची भेट देत पाहणी केली.




विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वामन तुर्के, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभाग प्रमुख डॉ प्रबाश साहू यांचा समितीत समावेश होता. मध्य पदेश सरकारच्या संस्कृती मंत्रालय अंतर्गत भोपाळ येथील आदिवासी संग्रहालय आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय या दोन्ही संग्रहालयांना समितीने भेट देत पाहणी केली.
मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालय
आदिवासी समाज आणि शहरी जीवन यांच्यातील परस्पर संबंध दाखविणारे एकसमान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेश येथील आदिवासी संग्रहालय एक उत्तम उदाहरण आहे. भोपाळ येथील आदिवासी संग्रहालयाच्या आधुनिक इमारतीत आदिवासी जीवनाचे प्रदर्शन दर्शविण्यात आले आहे. या संग्रहालयात आदिवासी जीवन शैली वर आधारित विविध गॅलरीज तयार करण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशातील सांस्कृतिक विविधता, आदिवासी जीवन, आदिवासी सौंदर्यशास्त्र, आदिवासी आध्यात्मिक जग, छत्तीसगड गॅलरी आणि रिक्कू गॅलरी यांचा यामध्ये समावेश आहे.
संग्रहालयात आदिवासी वस्तूंच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी आधुनिक सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. नष्ट होणाऱ्या ताग, बासूळ, पाने, लाकूड आणि फांद्या आदी वस्तूंचा कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संग्रहालयात प्रदर्शित वस्तूंबाबत विस्तृत माहिती देण्याकरिता विविध रंगांच्या प्रकाशाचा वापर तसेच क्यूआर कोड (QR) यासह ऑडिओ -विज्युअल साधनांचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळविणे सोपे होते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय
इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय श्यामला पर्वत रांगेत नैसर्गिक वातावरणात निर्माण करण्यात आले आहे. यातून तेथील आदिवासी संस्कृती आणि मानवी जीवन याचा संपूर्ण आलेख दिसून येतो. खुल्या जागेतील प्रदर्शन गॅलरी आणि एका इनडोअर गॅलरीचा समूह असलेला ‘विठी संकुल’ असे संग्रहालयाच्या स्थापत्यशास्त्रात दोन घटक आहेत. संग्रहालयात आठ खुल्या गॅलरी आणि बारा इनडोअर गॅलरीज आहेत. खुल्या गॅलरीत आदिवासी घरांच्या मॉडेल्सची बांधणी आणि त्यांच्या आवश्यक वस्तू दाखविण्यात आलेल्या आहेत.
‘विठी संकुल’ या गॅलरीत विविध आदिवासी संस्कृतीवरील गॅलरीज आहेत. गॅलरी १ मध्ये मानवाचे जैव-सांस्कृतिक उत्क्रांती आणि भारताचा प्राचीन इतिहास दाखविला आहे. गॅलरी २ मध्ये आदिवासी जीवनशैली दाखविली आहे. ज्यात शिकारी संकलक, शेतकरी, स्थलांतर करणारे आणि पारंपारिक समुदाय यांचा समावेश आहे. गॅलरी ३ मध्ये विविध आदिवासी समुदायांच्या उत्सव, विधी, संस्कार आणि विश्वासांचे प्रदर्शन केले आहे. गॅलरी ४ मध्ये भिल-राठवा धार्मिक विधी दाखविले आहेत. गॅलरी ५ मध्ये आदिवासी कला आणि शिल्पकला आहे.
गॅलरी ६ मध्ये विश्वास प्रणाली, ब्रह्मांडशास्त्र आणि संस्कारांवर आधारित प्रदर्शन आहे. गॅलरी ७ मध्ये संगीत वाद्ये आणि कलापारंपारिक परंपरा, गॅलरी ८ मध्ये मुखवटे, गॅलरी ९ मध्ये आदिवासी पदार्थ आणि लोककला परंपरा आणि गॅलरी १० मध्ये दृश्य संग्रहण आणि संशोधन यांचे प्रदर्शन केले आहे. गॅलरी ११ आणि १२ पूर्व भारताच्या आदिवासी संस्कृती आणि भारताच्या बेट संस्कृतींवर आधारित आहेत. या भेटी दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ भुवन विक्रम, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे डॉ मनोज कुर्मी, मध्यप्रदेश राज्य पुरातत्त्व विभाग आणि IGRMS चे डॉ अनुराधा पांडा व डॉ राजेश बिर्हमण यांचे मुलाचे सहकार्य लाभले. विद्यापीठाच्या पथकाने संची आणि भीमबेटका जागतिक वारसा स्थळांना देखील भेट दिली.
प्रदर्शन तंत्रज्ञान
सर्व इनडोअर गॅलरीत आदिवासी घरांचे दृश्य डायओरामास (मॉडेल्स) प्रमाणे तयार करण्यात आले आहे. आदिवासी कलेचे वापरलेले वस्तू ठेवण्यात आल्या असल्याने एक आदिवासी घराचे वास्तुशिल्प दिसून येते.