शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाचे उद्घाटन; ‘शरण इतिहासाचे नवे सुवर्णपान’
शरण साहित्य हा मानवतेचा खजिना – डॉ अरविंद जत्ती
कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे, असे गौरवोद्गार बेंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष डॉ अरविंद जत्ती यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाचा कार्यारंभ करण्यात आला. या निमित्ताने ‘शरण साहित्य: संकल्पना आणि प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. बसवकल्याणच्या अनुभवमंटपाचे अध्यक्ष डॉ बसवलिंग पट्टदेवरू आणि प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.
शरण साहित्य अध्यासनाच्या उद्घाटन समारंभाला मानव्यविद्या सभागृहात कोल्हापूर सह गडहिंग्लज, शिरोळ, जत, हेरवाड, बेळगाव, भालकी, इस्लामपूर, सोलापूर, पुणे इत्यादी ठिकाणांहून बसवप्रेमी नागरिक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ अरविंद जत्ती म्हणाले, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव लाभलेले शिवाजी विद्यापीठ आणि विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार यांचा महासंगम आज करवीरनगरीत होत आहे, अशी भावना आहे. बाराव्या शतकापासून ते एकविसावे शतक आणि येथून पुढेही जगाचे दिग्दर्शन करण्याची क्षमता शरण साहित्यामध्ये आहे. शरण साहित्याला धार्मिक समजणे गैर असून ते मूलतः आध्यात्मिक आहे, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. इतिहासापासून सार्वजनिक प्रशासन व्यवस्थेपर्यंत आणि सामाजिक न्यायापासून ते पर्यावरणापर्यंत अशा अनेकविध विषयांचा परामर्श शरण साहित्याने घेतलेला असून तो आजही पथदर्शी आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवाधिकारांचा जाहीरनामा असो की, भारताचे संविधान या दोहोंमध्ये ज्या मानवी मूल्यांचा उच्चार आहे, ते सर्व शरण साहित्यात आहे. प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, गुलामगिरी आणि छळाविरुद्ध आवाज उठविण्याचा अधिकार या सर्वच मानवी अधिकारांचे उच्चारण बसव तत्त्वज्ञानात आहे. विश्वात जे आहे, तेच तुमच्या माझ्या आत आहे, असे आत्यंतिक दर्शन घडविणारे शरण साहित्य अमूल्य आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात राजकीय मतभेद असले तरी ही दोन राज्ये आता बसवण्णांच्या अध्यात्मिक साहित्याने जोडले जात आहेत. भविष्यात हे बंध अधिकच दृढ होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आजघडीला बसव वचने भारतीय ४३ भाषांमध्ये डिजीटल स्वरुपात उपलब्ध केली आहेत. जागतिक भाषांमध्येही त्यांच्या अनुवादाचे प्रकल्प विचाराधीन आहेत. शिवाजी विद्यापीठाने वचनांचे रशियन भाषेत अनुवाद करण्यास सहाय्य करावे, अशी अपेक्षा जत्ती यांनी व्यक्त केली. आपले वडील भारताचे माजी उपराष्ट्रपती बी डी जत्ती यांचे पदवीचे शिक्षण कोल्हापुरात झाले, अशी आठवणही यावेळी जत्ती यांनी सांगितली. बसव तत्त्वज्ञानाची वैश्विकता विषद करणारे पॉवरपॉईंट सादरीकरण त्यांनी केले.
बसवकल्याण अनुभवमंटपाचे अध्यक्ष डॉ बसवलिंग पट्टदेवरू यांनीही आपण शिवाजी विद्यापीठातून एम ए ची पदवी घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, गणितातील तथ्ये ज्याप्रमाणे वैश्विक असतात, त्याचप्रमाणे बसवतत्त्वही वैश्विक आहे. सत्याची ताकद त्यामध्ये आहे. बाराव्या शतकात हजारो शरणांनी प्राणार्पण करून पुरोहितशाही आणि जातीयवादी प्रवृत्तींपासून शरण साहित्याचे संरक्षण व जतन केले. त्या शरणांच्या बलिदानाचे फलितस्वरुप आज शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने साकार होत आहे.
युवा वर्गात आत्मविश्वास, नैतिकता, जीवनमूल्यांप्रती निष्ठा निर्माण होऊन त्यांच्यात सर्वांगीण विकासाचे आत्मबल निर्माण होण्यासाठी शरणसाहित्याच्या अमृताचे थेंब उपयुक्त ठरतील. बसवण्णांचा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक समतेचा विचार हाच फुले, शाहू, आंबेडकरांचाही होता. या खऱ्या बसवतत्त्वांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी अध्यासन मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा संगम समजून घेऊन अहंभाव संपविण्यासाठी बसवतत्त्वांचा अभ्यास आणि आचरण आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा या विषयांतर्गत आपल्याला बसवण्णांसारख्या महामानवांचा अभ्यास करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी यांनी अधिसभेत ठरावाच्या माध्यमातून अध्यासनाचे बीजारोपण केले. त्याला अधिसभेसह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या सर्वच अधिकार मंडळांचे समर्थन लाभले. शासन, लोकप्रतिनिधी आणि दातृत्ववान समाज यांच्या पाठबळावर अध्यासन कार्यान्वित होत आहे. समग्र मानवतेच्या प्रस्थापनेसाठी अध्यासनाचे काम योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी यापुढील काळातही हा पाठिंबा कायम राहावा. येत्या जून २०२५पासून अध्यासनामार्फत महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर दोन क्रेडिटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे कर्नाटकातील विविध विद्यापीठांतील शरण साहित्य अध्यासनांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतील. तसेच, रशियन भाषेत सुरवातीला काही वचनांचे प्रायोगिक अनुवाद करून पुढे टप्प्याटप्प्याने प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुरवातीला डॉ अरविंद जत्ती, डॉ बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते शरण साहित्याची मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषांतील १५ पुस्तके असलेली टोपली कुलगुरू डॉ शिर्के यांच्याकडे सुपूर्द करून अध्यासनाचे अभिनव पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ विलास शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी काही संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यासनासाठी देणगीचे धनादेशही कुलगुरू डॉ शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमास प्राचार्य जी पी माळी, डी यू पवार, सतीश घाळी, सरलाताई पाटील, डॉ आप्पासाहेब पुजारी, प्राचार्य टी एस पाटील, वसंतराव मुळीक, रावसाहेब पुजारी, यश आंबोळे, डॉ अनमोल कोठडिया यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.