गोंडवाना विद्यापीठात मराठी भाषेचा उत्सव: विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उघडल्या

मराठी भाषेच्या जाणकारांसाठी हा सुवर्णकाळ आहे – अविनाश पोईनकर, सुप्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक व संशोधक

गडचिरोली : मराठी भाषेच्या जाणकारांसाठी हा सुवर्णकाळ असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून लक्षवेधी काम करावे म्हणजे यश त्यांच्या पायाशी असेल, असे मत सुप्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक व संशोधक यांनी व्यक्त केले. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालाय आणि पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्त्याच्या भूमिकेत मराठी भाषा:रोजगाराच्या संधी या विषयावर ते बोलत होते.

मराठी भाषेची श्रीमंती सातासमुद्रापलीकडे पोहोचलेली असून तिला पराजयाची किवा मरणाची भीती नाही. ती अजरामर असून म्हाइम्भट, ज्ञानेश्वर, तुकाराम, मुकुंदराजांनी साहित्यरुपात ठेवलेल्या मराठीच्या अस्सल ठेव्याकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक फायदे होणार आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करता यायला हवा. मराठी भाषेची अस्मिता टिकविण्यासाठी मराठी भाषिकांनी मराठीतूनच संवाद करावा.

मराठी भाषेच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्या शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले मार्ग आपणच शोधले पाहिजे. मराठीच्या जाणकारांसाठी हा सुवर्णकाळ असून रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. मराठी भाषेत अनुवादाची मोठी परंपरा असून अनुवाद प्रक्रियेचे जागतिकीकरण झाले आहे. अनुवाद क्षेत्र, पत्रकारिता, BBC मराठी, डीजीटल माध्यमे, मुद्रित शोधन, दूरदर्शन, आकाशवाणी, जाहिरात माध्यम, निवेदन, कथन सूत्रसंचालन, वक्तृत्त्व, लेखन अशा अनेक ठिकाणी मराठी जाणकारांची गरज असल्याने रोजगाराची उपलब्धता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत प्रभुत्त्व संपादन करावे आणि उंच भरारी घ्यावी, असे वक्तव्य सुप्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक व संशोधक अविनाश पोईनकर यांनी केले.

Advertisement

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणारे १४ कोटी लोक असून १३ कोटी एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात २५० कोटींच्या मराठी पुस्तकांची उलाढाल होते, असेही ते म्हणाले. डॉ श्याम खंडारे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा, भाषा संचालनालयाचे प्रतिनिधी जनार्दन पाटील, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या डॉ सविता गोविंदवार, प्रा अमोल चव्हाण, डॉ हेमराज निखाडे, डॉ निळकंठ नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जनार्दन पाटील यांनी मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याविषयी व व मराठी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कामाच्या संधीविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रमुख डॉ सविता गोविंदवार यांनी मराठी भाषेच्या ज्ञानाने मला काय मिळवून दिले आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या कमाईचे साधन कसे ठरू शकते? यावर अध्यक्षीय भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी माडिया भाषेत अनुवाद केलेली संविधानाची प्रास्ताविका अविनाश पोईनकर यांनी मराठी विभागाला भेट दिली. प्रमुख डॉ प्रशांत सोनावणे, डॉ नरेंद्र आरेकर, डॉ राम वासेकर, प्रा संदीप कागे, डॉ प्रीती पाटील, प्रा रोहित कांबळे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

प्रास्ताविक डॉ हेमराज निखाडे यांनी केले. मराठी भाषा पंधरवड्यात पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाने अभिजात मराठी भाषा आणि तंत्रज्ञान उपयुक्तता, बातमी लेखन, स्पर्धा परीक्षा आणि मराठी व्याकरण, मराठी विश्वकोश परिचय कार्यशाळा, मराठी भाषा:रोजगाराच्या संधी, नाट्यलेखन तंत्र कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले. अतिथींचा परिचय देवयानी नवघरे, सूत्रसंचालन तुषार दुधबावरे तर आभार प्रदर्शन विशाल भांडेकर या विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

13:35