डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात ‘अविष्कार २०२५’ चा शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा
लोणारे / रायगड : अविष्कार २०२५, महाराष्ट्रातील एक महत्त्वाची राज्यस्तरीय संशोधन आधारित स्पर्धा, आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे येथे मोठ्या धूमधामात सुरू झाली. या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी होते आणि यावर्षी हे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. स्पर्धेत 26 विद्यापीठांमधून एकूण 30 लाख विद्यार्थ्यांपैकी ७७७ नवकल्पक विद्यार्थ्यांनी ६ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सहभाग घेतला आहे. १३ ते १५ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा चालू राहणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यापीठ अनुदान आयोगचे सचिव डॉ. मनीष जोशी, डिक्की, पुणेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, दीनदयाळ संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. नलबलवार, कार्यकारी परिषदेचे सभासद प्रवीण सरदेशमुख आणि राज्यपाल कार्यालय भवन नियुक्त समितीचे गावंडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते ‘बांबू केंद्र’चे उद्घाटन, जे प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले.
डॉ. खोब्रागडे यांनी या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती दिली आणि स्वावलंबी भारत अभियानावरील विचार मांडले. कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर भावे आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महानुवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी यांनी प्राचीन ऋषींच्या अविष्कारांविषयी माहिती दिली, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर भाष्य केले.
प्राध्यापक मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि शासकीय उपक्रमांविषयी माहिती दिली आणि २०४७ च्या स्वप्नाच्या दिशेने मार्गदर्शन केले. प्राध्यापक मनीष जोशी यांनी विद्यार्थ्यांना उत्सव आणि विज्ञानाविषयी सखोल माहिती दिली, तसेच विविध सरकारी योजनांचा संदर्भ दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे स्वागत केले आणि नव-अविष्कार व संशोधनाची महती सांगितली. त्यांनी NEP २०२० आणि त्याच्या भविष्यकालीन प्रभावांवर विचार मांडले. कार्यक्रमाच्या समारोपात कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता केली.