अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विवेकानंद रन मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न
२५०० हून अधिक विद्यार्थी व नागरिक सहभागी
पुणे : स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व त्याचसोबत अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे विचार जनसामान्यात पोहोचवण्यासाठी, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ‘विवेकानंद रन’ मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन चे उद्घाटन अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री ‘डॉ वीरेंद्र सिंह सोलंकी’ यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री अथर्व कुलकर्णी, प्रांत खेलोभारत संयोजक पराग कुलकर्णी, पुणे महानगर अध्यक्ष प्रा डॉ प्रगती ठाकूर, पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे, महानगर खेलोभारत संयोजक प्रसाद सोनवणे हे सर्व उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरची रन, स्वामी विवेकानंदांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त, ५ किलोमीटरची रन जिजाऊंच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त व ३ किलोमीटरची रन अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या होत्या. यात अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये २५०० हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला ज्यात सर्वच वयोगटातील लोक सहभागी होते.
युवा पिढीत निरोगी जीवनशैली वाढावी व त्याचबरोबर व्यसनाधीनतेच्या वृत्तीला आळा बसावा या हेतूने ह्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे संपूर्ण आयोजन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमात २५० हुन अधिक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी काम केले व अशा प्रकारे एका मोठ्या गटाने एकत्रित येऊन विवेकानंद रन नावाचे शिवधनुष्य पेलले. व ही मॅरेथॉन यशस्वीरित्या जल्लोषात पार पाडली.
यावेळी बोलताना, “ युवकांनी, ही दौड करताना विवेकानंदांचा एक गुण आत्मसात करून त्यावर वर्षभर काम करावे व या वर्षभरात देशासाठी आपण काही करू शकतो का यावर विचार करावा.” असे मत अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री ‘डॉ वीरेंद्रसिंह सोलंकी’ यांनी व्यक्त केले.