स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र
नांदेड : ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पुरुष/महिला मल्लखांब स्पर्धा भोपाल येथील एल एन सी टी विद्यापीठ येथे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या असून मल्लखांब स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्यांमधून ८० विद्यापीठाने सहभाग घेतला होता. यामधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मलखांब संघ चौथे स्थान पटकावून पात्र ठरला आहे.
ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पहिले ८ सांघिक खेळाडूची निवड करण्यात येते. या संपन्न झालेल्या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष गट सांघिक पोल, टांगता, रोपमल्लखांब स्पर्धेत एकूण गुण (११८.६०) प्राप्त करून सहभागी असलेल्या ८० विद्यापीठांमधून ‘स्वारातीम’ विद्यापीठच्या मल्लखांब खेळाडूंनी चौथे क्रमांक पटकावले.
निवड झालेल्या खेळाडूमध्ये सौरभ पवार, दत्ता गोरगले, शैलेश मध्यलवाड, लक्ष्मीकांत मस्के, वैभव हाडमोडे, विजय केंद्रे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना संघ व्यवस्थापक डॉ अभिजीत खेडकर, प्रशिक्षक कुलदीपसिंघ जाट यांनी मार्गदर्शन केले.
या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ डी डी पवार, क्रीडा संचालक डॉ भास्कर माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मलिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडू, व्यवस्थापक व मार्गदर्शक यांना शुभेच्छा दिल्या.