सौ के एस के महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
बीड : अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्वप्ने व स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांना देऊन समतेचे स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्या काळातही राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचारही समाजाला विधायक दिशा देत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे प्रशासकिय अधिकारी डॉ सुधाकर गुट्टे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ अन्सार उल्ला शफी उल्ला खान, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा जालींदर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रास्ताविकात डॉ पल्लवी इरलापल्ले म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मत व्यक्त केले. आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची वैचारीक, राजकीय, सामाजीक जडणघडण करण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे विचार अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे आवश्यक असल्याचेही सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, आपल्या मुलावर संस्कार करतांना प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि चरित्र समोर ठेवणे आवश्यक आहे.स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जिजाऊचे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील सामान्य, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित लोकांना न्याय देत त्यांचा उत्कर्ष कसा साधला जाईल यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वराज्यास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ बळीराम राख यांनी केले. तर आभार डॉ पंडित खाकरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास डॉ अनिल शेळके, डॉ पंडित खाकरे, डॉ संतोष तळेकर, डॉ अशोक डोंगरे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.