राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नागपूर फिल्म फेस्टिवलच्या चलचित्र नगरीचे उद्घाटन
विद्यापीठ सर्व कलांचे ज्ञानपीठ – कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे
प्रेक्षकांनी घेतला विविध फिल्म स्क्रीनिंगचा आनंद
नागपूर : विद्यापीठाच्या नावातच विद्या म्हणजे ज्ञान आहे. सर्व कलांचे ज्ञानपीठ असल्याने विद्यापीठात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नागपूर फिल्म फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट महोत्सवानिमित्त निर्माण करण्यात आलेल्या चलचित्र नगरी (प्रदर्शनी)चे उद्घाटन शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील राजकपूर सभागृहात आयोजित उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीए राजेश लोया, अतुल पांडे, मिलिंद लेले, अजय राजकारणे यांची उपस्थिती होती. कोणत्याही विद्यापीठाने अशाप्रकारे चित्रपट महोत्सव आयोजित करावा अशी ही पहिलीच घटना असावी, असे डॉ बोकारे पुढे बोलताना म्हणाले. चित्रपट ही देखील एक कलाच आहे. कोणतीही विद्या, कला, अभिव्यक्तीपासून आपण विद्यार्थ्यांना वेगळे ठेवू शकत नाही. चित्रपट ही कला विद्यापीठापासून वेगळी राहू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठाने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याचे कुलगुरू म्हणाले.
विद्यापीठात चित्रपट महोत्सव आयोजित करीत विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने संबंधित प्राधिकारणींचे कुलगुरूंनी आभार मानले. चित्रपट-नाटक हे समाजाचे दर्पण असून समाजातून अनेक गोष्टी चित्रपटात येतात. समाजातील संवेदनशीलता टिपत दिग्दर्शक त्याची अभिव्यक्ती चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवत असतो. व्यक्तीने कुठेतरी अभिव्यक्त होण्याची गरज असते. सिनेमा-नाटक हे भावनेचा निचरा करण्याचे साधन आहे. प्रत्येकाला समाज तसेच व्यवस्थेविषयी राग निर्माण होतो. त्यामुळे योग्यप्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही तर भावनेचा उद्रेक होतो.
त्यामुळे भावनेचा निचरा व्हावा म्हणून विद्यापीठाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे डॉ. बोकारे म्हणाले. पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या दरम्यान नेहमीच संघर्ष दिसून येतो. आज आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने प्रत्येकाच्या मनात त्याविषयी भावना निर्माण केली आहे. भावना ही प्रत्येक स्तरात असून चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेला ‘नया दौर’ हा चित्रपट आज देखील तेवढाच प्रासंगिक वाटतो, असे कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले. कोणतेही विद्यापीठ समाजाच्या विकासाचे केंद्रबिंदू असावे, नव्या कल्पना म्हणजेच ज्ञान असून त्यानेच समाज विकसित होईल, असे ते म्हणाले. सुंदर आयोजन केल्याने नागपूर चलचित्र फाउंडेशनचे कुलगुरूंनी अभिनंदन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री राजेश लोया यांनी चलचित्राचा आजच्या पिढीवर मोठा प्रभाव पडत असून तरुण पिढी त्याप्रमाणे अनुकरण करू पाहत आहे. चित्रपट कलेचा प्रभाव व्यक्ती, समाज तसेच पिढीवर दिसून येतो. आज चित्रपटांमध्ये भारताला तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे नाटकांमधून घरातील कलह यासह अन्य बाबींतून दिसून येतो. यामध्ये परिवर्तन करण्यासाठी येथील एक समूह एकत्र आला आहे. चित्रपटात कोणते विषय असावेत, तरुण पिढीवर सकारात्मक प्रभाव पडावा, समाजाला योग्य दिशेने येणारे चित्रपट असावे यावर विचारमंथन होत असल्याचे श्री लोया म्हणाले. तत्पूर्वी प्रास्ताविक करताना आयोजन समितीचे सदस्य जय गाला यांनी नागपूर फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली. या चित्रपट महोत्सवामध्ये एकूण ३५० चित्रपटांची नोंदणी झाली आहे. त्यातील १३८ चित्रपट नागपूर, १७८ विदर्भातून अशा एकूण ६५ शहरातून तसेच २२ भाषांमधून चित्रपट प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपस्थितांमध्ये विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनामित सदस्य डॉ. समय बनसोड, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्यासह विविध प्राधिकारणींचे सदस्य, शैक्षणिक विभागाचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कोमल मेहता हिने केले तर आभार जुई हरिदास हिने मानले.
चलचित्र नगरीत दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन
नागपूर फिल्म फेस्टिवलच्या अनुषंगाने विद्यापीठात निर्माण करण्यात आलेल्या चलचित्र नगरीत अनेक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये १०० ते १५० वर्ष जुने असलेले फोटोग्राफी करण्याचे कॅमेरे, अत्यंत जुने असे टेप रेकॉर्डर, दूरचित्रवाणी, यासह पेंटिंगच्या स्वरूपात भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास दर्शविण्यात आला आहे. धरमपेठ शिक्षण संस्था द्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्रदर्शनीत मोलाचे सहकार्य लाभले आहे. सोबतच कुंभमेळ्यातील काही निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन देखील या ठिकाणी भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.