डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे ‘अविष्कार’ महोत्सव १२ जानेवारी पासुन
‘राज्यातील पंचेवीस विद्यापीठाचे साडे सातशे संशोधक सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी दिली.
रायगड / लोणेरे : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करुन, त्यांच्याकडून नवनिर्मिती करण्याच्या हेतूने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यपाल तथा विद्यापिठाचे कुलपती यांचे कार्यालयामार्फत लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठात १२ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत १७ वे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन ‘अविष्कार २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात मा. कुलगुरु डॉ के व्ही काळे यांनी शनिवारी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले,अविष्कारचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयेागाचे सचिव डॉ. मनिष जोशी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ४ वाजता होणार आहे डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास दीनदयाळ संशोधन संस्थेचे संचालक प्रा. उपेंद्र कुलकर्णी, डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे हे विशेष अतिथी म्हण्ाून उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी या महोत्सवातील उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या प्रतिकृतींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. आयसरचे प्रा. सुनिल भागवत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
आविष्कार ही राज्यव्यापी आंतर- विद्यापीठ संशोधनावर आधारित स्पर्धा असून, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण २६ विद्यापिठांचा समावेश आहे. या कार्यक्रमात ७७७ नवकल्पक विद्यार्थी व २०० पेक्षा अधिक विद्यापीठ प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मानवता भाषा आणि ललितकथा, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,औषधे आणि फार्मसी आणि कृषि आणि पशुसंवर्धन या सहा वेगवेगळया श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी कुलगुरु डॉ. काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
आविष्कार या स्पर्धेसाठी राज्यपाल कार्यालय राजभवन यांनी नियुक्त केलल्या निरीक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे.
विजेत्याना राजभवनात सादरीकरणाची संधी – डॉ काळे
आविष्कार ही स्पर्धा राजभवन कार्यालयातून २००६-०७ शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली. या स्पर्धेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे, त्यांना संशोधनासाठी प्राथमिक संधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देवून त्यांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी शिष्यवृत्तीचा देखील समावेश आहे.
यातील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी राजभवन येथे राज्यपालांच्या समक्ष सादरीकरण करता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिली.