‘नागपूर फिल्म फेस्टिवल’मध्ये विंटेज प्रोजेक्टरवर प्रेक्षकांनी लुटला सिनेमाचा आनंद
-‘स्टोरी टेलिंग’ मधून महापुरुषांच्या आठवणींना उजाळा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘नागपूर फिल्म फेस्टिवल’मध्ये विंटेज प्रोजेक्टरवर प्रेक्षकांनी सिनेमाचा आनंद लुटला. विद्यापीठ परिसरात ‘स्टोरी टेलिंग’ कार्यशाळेतून महापुरुषांच्या आठवणींना शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी उजाळा मिळाला.
विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा शैक्षणिक परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे नागपूर फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी खुल्या परिसरात कापडी पडद्यावर राजकपूर यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘आवारा’ हा तत्कालीन विंटेज प्रोजेक्टवर दाखविण्यात आला. भारतीय सिनेसृष्टीत चलचित्र चित्रपट निर्मिती सुरू झाल्यानंतर विंटेज प्रोजेक्टरवर त्याचे त्याकाळी प्रदर्शन केले जात होते. आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाल्याने विंटेज प्रोजेक्टर कालबाह्य झाले आहे. मात्र, सिनेसृष्टीतील हा ऐतिहासिक वारसा नागपूर फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून नागपूरकरांना अनुभवता येत आहे. सायंकाळच्या सुमारास या चित्रपटाचे प्रदर्शन होत असल्याने विद्यापीठ परिसराला जणू सीनेसृष्टीचे रूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी देखील तत्कालीन सिनेमाचा भरभरून आनंद घेतला.
स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जयंती दिवस, पुण्यश्लोक देवी अहिल्यामाता यांचे ३५० वेळ जयंती वर्ष, भगवान बिरसा मुंडा यांचे १५० वे जयंती वर्ष, महर्षी दयानंद सरस्वती यांचे २०० वे जयंती वर्ष, भारतीय संविधानाचे ७५ वेळ वर्ष तसेच वीरपुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाला समर्पित यापासून प्रेरणा घेऊन या नागपूर फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्याने तत्पूर्वी स्टोरी टेलिंग कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये डॉ. दीपलक्ष्मी भट यांनी पुण्यश्लोक देवी अहिल्यामाता यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थित त्यांना माहिती दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना तिलांजली देत कशाप्रकारे सामाजिक कार्य केले याची माहिती डॉ. भट यांनी दिली. जलसंधारण विधवा पुनर्विवाह, उत्कृष्ट राजकारण, गुन्हेगारी जमातीतील लोकांना सामाजिक जीवनात मिळवून दिलेले स्थान याविषयी त्यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. लखेश्वर चंद्रवंशी यांनी वीरपुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाविषयी माहिती देत युवकांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रेरित केले.
चलचित्र नगरीचे (प्रदर्शनी) आज उद्घाटन
‘नागपूर फिल्म फेस्टिवल’च्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरात निर्माण करण्यात आलेल्या चलचित्र नगरी (प्रदर्शनी)चे शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या शुभहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर चलचित्र फाउंडेशन ने केले आहे.