पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वस्त्रोद्योगात वेगळे नाव निर्माण करावे
दीक्षांत समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
सोलापूर : सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी आहे. आज वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आहेत. त्याचा फायदा घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वस्त्रोद्योगाविषयी विविध अभ्यासक्रम, प्रकल्प तसेच उपक्रम सुरू करून वेगळे नाव निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे महामहिम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभ पार पडला. यात राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती, पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकूण 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. यामध्ये अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद अधिसभा सदस्य आणि पदवी घेणारे विद्यार्थी दीक्षांतचा बाराबंदी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते.
राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरा करीत आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कुशल प्रशासक होत्या. देशभर मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. वस्त्रोद्योगातही त्यांची कामगिरी प्रसिद्ध आहे. आज विद्यापीठाने बाजारपेठेची गरज ओळखून त्यानुसार अभ्यासक्रम सुरू करणे व त्याचे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचाही यासाठी फायदा होतो. त्याचा फायदा घेत विद्यापीठाने सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीची ओळख जगभर पोहोचवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेऊन त्यावर काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जगात भारतीय अर्थव्यवस्था मोठी बनत असल्याचे सांगून ‘विकसित भारत 2047’ साठी विद्यार्थी व शिक्षकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी यांनी दीक्षांत भाषण केले. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी कृषी, उद्योग, आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयांना घेऊन विशेष काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संशोधनाला महत्त्व देऊन आपले वेगळेपणा सिद्ध करावे. नाशवंत झालेल्या फळापासून इथेनॉल निर्मिती होते. असे काही वेगळे संशोधन व व्यवसाय विद्यार्थ्यांनी उभे करून प्रगती साधावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या विविध प्रस्तावांची तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या अध्यासन केंद्राची माहिती दिली. ‘पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियान’ यातून मंजूर झालेल्या शंभर कोटी निधीमधून विविध विकास कामे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात निर्माण होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक अनावरणाचे निमंत्रण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देण्यासंदर्भात राज्यपाल महोदयांना विनंती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक ननवरे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठामार्फत अहिल्यादेवी यांच्या जीवनचरित्र विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन यानिमित्त आयोजित करण्यात आले होते. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात एकूण 55 चित्रे ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मान्यवर चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांचा यात समावेश आहे. राज्यपाल महोदयांनी चित्रे पाहून चित्रकारांचे कौतुक केले.