महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा २८ वा स्थापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा

हिंदी ही भविष्यातील भाषा म्हणून विकसित करण्याची जबाबदारी हिंदी विश्‍वविद्यालयाच्या खांद्यावर – पद्मश्री प्रो हरमहेंद्र सिंह बेदी

लक्ष्मीबाई केळकर वसतिगृहाचे लोकार्पण

नववर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाच्या 28 व्या स्थापना दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना विश्‍वविद्यालयाचे कार्यकारी परिषद सदस्य, पद्मश्री प्रो हरमहेंद्र सिंह बेदी म्हणाले की हिंदीला भविष्यातील भाषा म्हणून विकसित करण्याची मोठी जबाबदारी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठावर आहे. विश्‍वविद्यालयाचा 28 वा स्थापना दिन बुधवार, 08 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष्मीबाई केळकर वसतिगृहाचे उद्घाटन पद्मश्री प्रो हरमहेंद्र सिंह बेदी यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

कस्तुरबा सभागृहात स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे पद्मश्री प्रो. हरमहेंद्र सिंह बेदी, विशेष अतिथी ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयाच्‍या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. इमरै बंघॉ, कार्य-परिषद सदस्य गोविंद सिंह, प्रो. कृपाशंकर चौबे, प्रो. गोपाल कृष्ण ठाकूर, डॉ. रामानुज अस्थाना आणि कुलसचिव प्रो. आनन्‍द पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पाहुण्यांच्या हस्ते ‘विदेशी हिंदी सेवी’ वर केंद्रित विश्‍वविद्यालयाच्या 2025 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे पद्मश्री प्रो. हरमहेंद्र सिंह बेदी हिंदीचे महत्त्व सांगताना म्हणाले की दोन शक्ती या देशाला अखंड भारत बनवतात. एक जीटी रोड आणि दुसरी हिंदी. हिंदीशिवाय पर्याय नाही. संपूर्ण जगाने हिंदीसह गांधीजींच्या विचारांचे अनुसरण केले पाहि‍जे. गांधी आणि आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाची ओळख जागतिक पटलावर निर्माण होत आहे. हिंदी ही आर्थिक सत्ता आणि व्यापाराची भाषा बनली आहे. जगात ज्याप्रमाणे नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांचे नाव घेतले जाते, त्याचप्रमाणे भविष्यातही हिंदी विश्‍वविद्यालयाचे नाव घेतले जाईल आणि हे विश्‍वविद्यालय जगभर ज्ञानाचा दीप प्रकाशमान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

विशेष अतिथी डॉ. इमरै बंघॉ म्हणाले की हिंदी ही मुघल साम्राज्याची संपर्क भाषा राहिली आहे. भारतात हिंदीला विशेष स्थान आहे. हिंदीची वाढती स्वीकृती आणि प्रभाव यावर भाष्य करताना त्यांनी हिंदीच्या मर्यादेबद्दल खंतही व्यक्त केली. ते म्हणाले की आम्ही हिंदीचा आदर करतो पण त्याचा वापर करत नाही. लोक इंग्रजीच्या मागे धावू लागले आहेत आणि लोकभाषा विसरत चालले आहेत. मी हंगेरीचा रहिवासी असलो तरी गेल्या ३८ वर्षांपासून मला हिंदीबद्दल आत्मीयता आहे. हिंदीमध्‍ये भावनात्‍मकता मिळते आणि जेव्हा मी ते भारतात बोलतो तेव्हा मला घरी असल्‍या सारखे वाटते. ते म्हणाले की भाषा जाणून घेऊन भाषांच्या सीमा वाढवता येतात.

कार्यकारी परिषद सदस्य गोविंद सिंह यांनी सांगितले की या विश्‍वविद्यालयाशी सुरुवातीपासूनच जोडलो आहे. हे विश्‍वविद्यालय केवळ 28 वर्षांचे आहे, म्हणजे बालपणात. आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विश्‍वविद्यालय भविष्यात स्मरणात राहील असे शैक्षणिक कार्य करेल. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह पद्मश्री प्रो. बेदी आणि डॉ. इमरै बंघॉ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की हिंदी हे आमचे घर आहे. सर्व भारतीय भाषांशी संवाद साधून आपण पुढे जायला हवे, हाही हिंदी विश्‍वविद्यालयाचा मूळ उद्देश आहे. स्थापना दिनानिमित्त त्यांनी विश्‍वविद्यालय परिवाराला शुभेच्छा देत विश्‍वविद्यालयाला पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे असे सांगितले.

स्वागतपर भाषणात प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल म्हणाले की, 1878 मध्ये भारतेंदू यांनी हिंदी विश्‍वविद्यालयाचे स्वप्न पाहिले. त्यांच्या स्वप्नानंतर अनेक वर्षांनी हिंदी विश्‍वविद्यालयाची स्थापना झाली. आता आपण कठोर मेहन आणि परिश्रम देऊन विश्‍वविद्यालयाला पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे. कार्यक्रमात पद्मश्री प्रो. बेदी आणि डॉ. इमरै बंघॉ यांना कुलगुरू प्रो. सिंह यांच्या हस्ते हिंदी सेवी सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन डॉ. रामानुज अस्थाना यांनी केले. विश्‍वविद्यालयाचा एक वर्षाचा प्रगती अहवाल प्रो. गोपाल कृष्ण ठाकूर यांनी सादर केला. ते म्हणाले की विश्‍वविद्यालयाचा विस्तार 08 विद्यापीठ, 28 विभाग आणि 03 केंद्रांद्वारे होत आहे. गेल्या वर्षभरात अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून विश्‍वविद्यालयाने आपल्या शैक्षणिक प्रगतीकडे पाऊल टाकले आहे.

स्थापना दिनाची सुरुवात गांधी हिल्स वर राष्ट्रपिता महात्मा गांधी व बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर समता भवन येथील डॉ. आंबेडकरांच्‍या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रथमा भवनाच्या प्रांगणात कुलगुरू प्रो. सिंह यांच्या हस्ते विश्‍वविद्यालयाचा ध्वज फडकविण्‍यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्‍ज्‍वलन, कुलगीत आणि गांधीजींच्या फोटोला पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कार्यकारी परिषद सदस्य व जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे यांनी केले.

कुलसचिव प्रो. आनन्‍द पाटील यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी राष्ट्र सेविका समिती नागपूरच्या राज्य संयोजिका रोहिणीताई आठवले, वर्ध्याच्या स्वयंसेविका अपर्णाताई हरदास, उज्वलाताई केळकर, अरुणाताई माहेश्वरी, अधिष्‍ठाता, विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page