राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कलावंतांचे मंडईत सादरीकरण
-विद्यापीठ परीक्षेत्रात मंडईचे सांस्कृतिक कार्यक्रम
नागपूर : (२२-११-२०२३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कलावंत मंडई कार्यक्रमाच्या सादरीकरणातून कौशल्य शिक्षण व तृणधान्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परिक्षेत्रात मंडईचे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘ग्राम चलो अभियान’ (‘रिचिंग टू अनरीच्ड’) उपक्रम राबवित आहे. विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिवर्तन व्हावे म्हणून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. १३ व १४ नोव्हेंबरला वेला येथे दंडार, २२ नोव्हेंबरला पिंप्री शहापूर, १७ नोव्हेंबरला कारदा, १६ नोव्हेंबरला मुजबी येथे कथासार, गोंधळ, कीर्तन, १५ नोव्हेंबरला कोकड, १३ व १४ नोव्हेंबरला ठाणा जवाहर नगर येथे मंडई, दंडार, कीर्तन, खडा, तमाशा, १९ नोव्हेंबरला बोरगाव (खुर्द), २१ नोव्हेंबर बोरगाव (बु.), २१ नोव्हेंबरला करचखेडा, १५ नोव्हेंबरला मांडवी करडी रोड, २० नोव्हेंबरला सालेबर्डी, १७ व १८ नोव्हेंबरला कडवसी येथे मंडई कार्यक्रम पार पडले.
२३ नोव्हेंबरला जाक, मालेगाव (बाजार), २५ नोव्हेंबरला अजीमाबाद, २६ नोव्हेंबरला बेलगाव, ९ व १० डिसेंबरला शहापूर, ९ डिसेंबरला झबाडा, १९ डिसेंबरला कोकर्ता सोबतच सरपेवाडा, हिंजेवाडा येथे देखील मंडई कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. मंडई कार्यक्रमांच्या नियोजनासाठी माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या उपस्थितीत भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात नियोजन बैठक काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. परिसरातील २४ सरपंचांनी त्यांच्या पुढाकारातून मंडई कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले होते. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून राबविल्या जात असलेल्या विविध कौशल्य अभ्यासक्रमाची त्याचप्रमाणे तृणधान्याच्या औषधी गुणधर्म बाबत जनतेमध्ये जनजागृती केली जात आहे.