के एस के महाविद्यालयात किशोरवयीन मुलांसाठी “किशोरवस्था व आहार” विषयावर व्याख्यान आयोजित
योग्य आहार हीच आरोग्यदायी जीवनाचा पाया – प्रा अनुजा कंदी
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात किशोरवयीन मुलांच्या आरोग्य विषयासंबंधी गृहशास्त्र विभागाच्या वतीने “किशोरवस्था व आहार” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रा अनुजा कंदी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य आहाराचे महत्त्व सांगताना सांगितले, “योग्य आहार आणि सवयी आपले जीवन निरोगी आणि सुखकर बनवतात. किशोरवयीन मुलांनी आपल्या आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे, यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते. यामुळे मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार आणि वजनवाढीसारख्या समस्यांपासून दूर राहता येते.”
प्रा कंदी यांनी विद्यार्थ्यांना घरा-बाहेरील रासायनिक पदार्थांचे हानिकारक परिणाम देखील समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी हिरव्या ताज्या भाजीपाल्याचे महत्त्व सांगितले आणि त्यात अ जीवनसत्व, लोह आणि प्रथिनांचा समावेश असल्यामुळे शरीर निरोगी राहते. “सकस आहार, खासकरून हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश आपल्या आहारात असावा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळावे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ वंदना फटाले यांनी केली, तर आभार प्रदर्शन डॉ मंजूषा जाधव यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.