यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. शिक्षणशास्त्र केंद्रप्रमुख – समंत्रक कार्यशाळा संपन्न
नाशिक : – शिक्षक हा समाजव्यवस्थेचा आत्मा आणि या शिक्षकांचा शिक्षक हा समंत्रक असतो. त्यामुळे केवळ उपजीविकेपुरता शिक्षक, समंत्रक काम करत नाही. आपला व्यापक समाजरथ कुठे घेवून जायचा ही शिक्षणव्यवस्थेतील या घटकांची जबाबदारी असते व त्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या थेट देशाच्या उन्नतीशी संबंध असतो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी येथे केले. विद्यापीठाच्या यश इन सभागृहात मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या एम. ए. शिक्षणशास्त्र विषयाचे केंद्रप्रमुख व समंत्रक यांच्यासाठी दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याच्या समारोपप्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका प्रा. डॉ. संजीवनी महाले, विद्यार्थी सेवा सुविधा विभागाचे संचालक प्रा. प्रकाश देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात बोलतांना पुढे प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन म्हणाले की पुरातन काळापासून भारतीय समाज हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होता. हिंदीतील प्रसिद्ध कवी मैथीलीशरण गुप्त यांचे ‘भारतभारती’ हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला हे लक्षात येते. त्यामुळे भारतीय शिक्षणव्यवस्था ही मागासलेली होती हा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला. शिक्षकांनी अशा माहितीची सत्यता पडताळणी करून ज्ञानदानाचे कार्य करावे असे आवाहन प्र. कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणाच्या शेवटी केले. त्यानंतर या कार्यशाळेत एम. ए. शिक्षणशास्त्र संरचना आणि मूल्यमापन (प्रा. स्नेहल मांजरेकर), संपर्कसत्र कार्यवाही (प्रा. विजयकुमार पाईकराव), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिचय (प्रा. डॉ. संजीवनी महाले), ऑनलाईन पद्धतीने कृती सादरीकरण (परीक्षा विभागाचे श्री. प्रदीप पवार व श्री. चंद्रकांत पवार), संशोधन कार्य (प्रा. डॉ. संजीवनी महाले), शोधनिबंध विकसन (डॉ. राजकुमार ननवरे), अध्यपनविषयक क्षेत्रीय कार्य आणि आंतरवासियता कार्यवाही (डॉ. सुभाष सोनुने), समंत्रण संकल्पना व समंत्रण प्रतिमाने परिचय (डॉ. दयाराम पवार), संशोधनात शोधगंगासह माहिती तंत्रज्ञानाचा वापर (डॉ. प्रकाश बर्वे), प्राश्निक परीक्षक समीक्षक कार्ये (प्रा. सज्जन थूल) आदी विषयांवर संबंधित तज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रा. स्नेहल मांजरेकर यांनी केले.