असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे सर्वात तरूण अध्यक्ष म्हणून डॉ.प्रविण सूर्यवंशी

छत्रपती संभाजीनगर : असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या सर्वात तरूण अध्यक्षपदाचा कार्यभार महात्मा गांधी मिशन रुग्णालय व महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ.प्रविण सूर्यवंशी यांनी स्वीकारला असून ते अध्यक्ष म्हणून रुजू झाले आहेत. शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी आग्रा येथे झालेल्या असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत डॉ.प्रविण सुर्यवंशी यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. सूर्यवंशी हे वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून आपले काम पार पाडतील. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे ३८००० सभासद असून सर्जन्ससाठी कार्यरत असणारी ही देशपातळीवरील एक सर्वोच्च संस्था आहे. संस्थेचे मुख्यालय चेन्नई येथे असून देशभरातील सर्व भागांतील सर्जन्स संस्थेशी जोडलेले आहेत. ही संस्था देशातील सर्व सर्जन्सची शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. दरवर्षी संपूर्ण भारतातून संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होते. दक्षिण आशिया खंडामध्ये प्रगत तंत्रज्ञानाने व अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण व ज्ञान या संस्थांमार्फत दिले जाते. एएसआयचे अध्यक्ष डॉ. प्रविण सूर्यवंशी यांना जपान, अमेरिका, युके, मलेशिया, श्रीलंका आणि नेपाळ या देशांच्या वार्षिक परिषदेमध्ये बोलविले जाते व देशातील शासकीय योजना बनविताना त्यांचे मत घेतले जाते.

Dr. Pravin Suryavanshi takes charge as the youngest President of the Association of Surgeons of India

संस्थेच्या ८५ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉ.सूर्यवंशी यांच्या रूपाने आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष संस्थेला मिळाले आहेत. त्यांनी आजपर्यंत शिक्षण, संशोधन, प्रशासन, प्रशिक्षण, आरोग्य या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल या निवडीने घेतली असून त्याचीच पोचपावती म्हणून त्यांची ही निवड झाली आहे. डॉ. प्रविण सुर्यवंशी यांनी आजपर्यंत विविध स्तरावर वेगवेगळया माध्यमातुन गरजुंची रुग्णसेवा करीत कार्यरत आहेत. मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित भागात पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपन शस्त्रक्रिया अत्याधुनिक लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया, इंडोस्कोपी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. एमजीएमच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक सुविधा गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी ते सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आले आहेत. डॉ. सूर्यवंशी यांनी २०१८ साली असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या एक्सिकिटीव्ह कमिटीवर देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून जाण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तसेच असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र स्टेट चाप्टरचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी  मिळविला आहे.

Advertisement

एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा तसेच शल्य चिकीत्सा विभागातील सर्वांनी डॉ. सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ.प्रविण सूर्यवंशी यांच्याबद्दल माहिती :

डॉ.प्रवीण सूर्यवंशी हे सर्जरी या क्षेत्रामध्ये गेली दोन दशके झाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले सर्जन आहेत. मराठवाड्यातील ते पहिले लॅप्रोस्कोपीक आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन असून या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाविन्यपूर्ण संशोधनाला त्यांनी कायम प्रोत्साहन दिलेले आहे. आजपर्यंत त्यांनी १०००० पेक्षा अधिक सर्जरी केल्या असून २५००० रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. त्यांनी या अगोदर असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या गव्हर्निंग कोन्सिलचे कार्यकारी सदस्य म्हणूनही काम केलेले आहे. नॅशनल क्वालिटी इन्हान्समेंट प्रोग्रॅम राबवून डॉ.सूर्यवंशी यांनी देशपातळीवर वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता विकास यावर एएसआयच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी आणि एचपीबी शस्त्रक्रिया या क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान देत या क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. वैद्यकीय सेवा करीत असताना आपली सामाजिक बांधिलकी जपत ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत.

आज राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळाली आहे, याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. मला मिळालेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात जास्तीत – जास्त सर्जनचे कौशल्य सुधारण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजनावर तसेच एएसआय आदिच्या सर्व सुविधा व योजना जास्तीत – जास्त सर्जन्सपर्यंत पोहोचविण्यासाठी एएसआयचे डिजिटायाजेशन करण्यात येईल. जगातील अतिउच्च तंत्रज्ञान भारतातील गरीब रुग्णापर्यंत पोहचविण्याचे काम तसेच समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत उत्तम अनाई दर्जेदार वैद्यकीय सुविधा संघटनेमार्फत पोहचविण्यासाठी सदैव कार्यरत राहील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page