आदिवासी गौरव यात्रेतील प्राध्यापकांनी दिली आनंदवन व सोमनाथ प्रकल्पाला भेट
गडचिरोली : पुस्तकी ज्ञानाला अनुभवजन्य शिक्षणाची जोड देऊन नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी गौरव यात्रेतील अध्यापकांनी आनंदवन येथील संधी सदन, अटलवन, काष्ठ शिल्प, हातमाग, प्रिंटिंग प्रेस, स्वरानंदनवन, सीता रतन लेप्रसी हॉस्पिटल अशा विविध विभागांना भेटी देऊन माहिती घेतली.
यावेळी डॉ विकास आमटे यांनी चर्चेदरम्यान बाबा आमटे यांच्या कार्याला उजाळा दिला. आनंदवन मधील प्रकल्पांची माहिती आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे यांनी दिली.
सरस्वती गणवीर यांनी क्षेत्रभेटी दरम्यान सोमनाथ येथील प्रकल्पाची माहिती दिली. अरुण कदम यांनी प्रकल्पाविषयी सर्वांशी संवाद साधला. आभार प्राध्यापक जे बी पाटील यांनी मानले.
हा उपक्रम १५ ते २१ डिसेंबर या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला असून राज्यातील विविध महाविद्यालयांमधून २५ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. या अभ्यास दौऱ्यामध्ये आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा येथील लोक बिरादरी, सर्च, मेंढा-लेखा येथील उपक्रमांचा अभ्यास करण्यात येणार आहे.