यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षणशास्त्र पदव्युत्तर संशोधक मार्गदर्शक कार्यशाळा
नाशिक : – संशोधनास सुरुवात करण्याआधी आपल्या भवतालचे जग, त्या जगातील समस्या, त्या समस्यांवर किती जणांनी काय काय काम केले हे समजून घेतले पाहिजे. त्यांनतर त्यात असललेली ज्ञानाची पोकळी (नॉलेज गॅप) ओळखून मग आपले संशोधन व त्याची पुढची दिशा ठरवली पाहिजे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी येथे व्यक्त केले. विद्यापीठाच्या यश इन सभागृहात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या एम. ए. शिक्षणशास्त्र विषयाचे केंद्रप्रमुख व समंत्रक यांच्यासाठी आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा विद्यापीठ शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका प्रा. डॉ. संजीवनी महाले यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी ‘एकविसाव्या शतकातील संशोधनाची क्षेत्रे’ या विषयावर आपल्या भाषणात पुढे बोलताना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे पुढे म्हणाले की सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, लिंग समानता, जल – माती – वायू याविषयीचे संशोधन वेगवेगळ्या पातळींवर सुरु आहे. त्यातही मिश्र संशोधन पद्धतीचा वापर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्याची आपण माहिती ठेवली पाहिजे. ज्ञाननिर्मिती ही उच्च शैक्षणिक संस्थांचे उद्दिष्ट्य असते आणि ज्ञाननिर्मितीसाठी संशोधन हे अत्यावश्यक आहे. जी सतत चालणारी प्रकिया आहे. संशोधनासाठी संशोधकाच्या मनात प्रश्न निर्माण होने आवश्यक आहे. समाजातील, परिसरातील आपल्याला भेडसावणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी – समस्या यातून देखील संशोधन विषय प्राप्त होवू शकतो. आपण करत असलेले संशोधन त्या समस्या निवारणासाठी, समाजहितासाठी किती योगदान देवू शकते याचा विचार संशोधकाने करायला हवा. झेरॉक्स कागदाचा सहा वेळा वापर करता येईल असे यंत्र, मनुष्य निसर्गाचा किती वापर करून घेतो अशी ‘इकॉलोजीकाल फुटप्रिंट संकल्पना’ अशा एक ना अनेक गोष्टी विविध संशोधनातून समोर येत आहेत. त्याची जाण आपण ठेवली पाहिजे. भारतातील शैक्षणिक संशोधनाच्या बाबतीत इच्छुक संशोधकांनी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांचे गेल्या दोन वर्षातील निर्णय यांचा अभ्यास करावा असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.
या कार्यशाळेत एम. ए. शिक्षणशास्त्र संरचना आणि मूल्यमापन (प्रा. स्नेहल मांजरेकर), संपर्कसत्र कार्यवाही (प्रा. विजयकुमार पाईकराव), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिचय (प्रा. डॉ. संजीवनी महाले), ऑनलाईन पद्धतीने कृती सादरीकरण (परीक्षा विभागाचे श्री. प्रदीप पवार व श्री. चंद्रकांत पवार), संशोधन कार्य (प्रा. डॉ. संजीवनी महाले), शोधनिबंध विकसन (डॉ. राजकुमार ननवरे), अध्यपनविषयक क्षेत्रीय कार्य आणि आंतरवासियता कार्यवाही (डॉ. सुभाष सोनुने), समंत्रण संकल्पना व समंत्रण प्रतिमाने परिचय (डॉ. दयाराम पवार), संशोधनात शोधगंगासह माहिती तंत्रज्ञानाचा वापर (डॉ. प्रकाश बर्वे), प्राश्निक परीक्षक समीक्षक कार्ये (प्रा. सज्जन थूल) आदी विषयांवर तज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यापीठाचे प्र – कुलगुरू प्रा. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणशास्त्र विषय व आयोजित कार्यशाळेविषयी खुले चर्चासत्र घेवून समारोप करण्यात येणार आहे.