एमजीएममध्ये तीन दिवसीय कला महोत्सवाचे उद्घाटन
४२ व्या वर्धापनदिनानिमित्त चित्रकला, शिल्पकलेतील तज्ज्ञ करताहेत मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर : नामवंत उद्योजक आणि जेएनईसीचे माजी विद्यार्थी मिलींद गोडबोले आणि अंजू गोडबोले यांनी एक कॅनव्हास रंगवायला सुरुवात केली होती. सोबतच शिल्पकार कलाश्री विभुते काष्ठशिल्पाला रचना देत होते आणि चित्रकार अरविंद महाजन, हर्षवर्धन देवताळे कॅनव्हासवर आपल्या कलेचे प्रात्यक्षिक देत होते. एमजीएम विद्यापीठामध्ये लिओनार्दो द विंची स्कूल ऑफ डिझाईनतर्फे आयोजित तीन दिवसीय कला महोत्सव- कार्यशाळेचे आज झालेले आगळे- वेगळे उद्घाटन चिंतनगाह येथे उपस्थितांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळवत होते.
एमजीएम ट्रस्टच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू विविध उपक्रमांतर्गत येत्या अठरा तारखेपर्यंत हा कला महोत्सव सुरू राहणार आहे. कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी कॅनव्हासवर कलाकृतीची निर्मीती करत आपल्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक दिले, काष्ठशिल्प कोरण्याचा अनुभव घेतला. प्रमुख उपस्थित एमजीएम ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, वर्धापन दिन संयोजन समिती प्रमुख डॉ.अपर्णा कक्कड, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनीही यावेळी काष्ठशिल्प कोरण्याचा अनुभव घेतला.
या कार्यशाळेचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार, शिल्पकार घडविण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एमजीएम ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव यांनी आपल्या शुभेच्छापर संदेशातून व्यक्त केला. नामवंत चित्रकार, शिल्पकारांकडून प्रत्यक्ष शिकण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असल्याचे संचालक शुभा महाजन यांनी प्रास्ताविकामध्ये नमुद केले. स्कूल ऑफ फिल्म आर्टचे प्रमुख प्रा. शिवदर्शन कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.राजेश शाह यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा.अतुल कुंजर यांनी आभार मांडले.