शिवाजी विद्यापीठात विद्यापीठात स्टुडंट कट्टा सुरू
मास कम्युनिकेशन विभागाचा उपक्रम, विद्यार्थी घेणार तज्ज्ञांच्या प्रकट मुलाखती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागात स्टुडंट कट्टा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्टुडंट कट्टा या उपक्रमात महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींच्या मास कम्युनिकेशन तसेच पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मुलाखती घेणार आहेत. या कट्ट्यावर तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक तसेच विचारवंतांना पाचारण करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ताज्या घडामोडी, समाजातील विविध प्रश्न तसेच शिक्षण आणि संशोधन आदी विषयांवर अभ्यासकांची मते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थीदशेतच पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्राची प्रात्याक्षिकाद्वारे माहिती व्हावी, या यामागचा उद्देश असल्याचे मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी सांगितले. स्टुडंट कट्ट्यावर अनेक तज्ज्ञ लोक येऊन मुलाखती देणार असल्याचे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि माहिती मिळविण्याची ही चांगली संधी आहे, असे मत कुलसचिव डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व मुलाखती मास कम्युनिकेशनच्या ‘स्पार्क’ या युट्यूब चॅनलवरून प्रसारित केल्या जाणार आहेत.
स्टुडंट कट्यावर विद्यार्थ्यांनी डॉ. शिंदे यांची ‘राज्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणी नियोजन’ या विषयावर प्रकट मुलाखत घेतली. पी. जी. डिप्लोमाचा विद्यार्थी अक्षय जहागीरदार याने मुलाखतीचे संचालन केले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. शिंदे यांना विविध प्रश्न विचारत संभाव्य दुष्काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेतली. स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशन तथा पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. प्रसाद ठाकूर उपस्थित होते.