‘नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार’ विषयावर व्याख्यान
-मानव जोडो संघटनेचे सरचिटणीस रमेशचंद्र सरोदे यांचे प्रतिपादन
नागपूर : प्रत्येक गुरुदेवप्रेमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नामविस्तार लढ्याचा प्रणेता आहे, असे प्रतिपादन मानव जोडो संघटनेचे सरचिटणीस श्री रमेशचंद्र सरोदे यांनी केले. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार १३ डिसेंबर २००५ रोजी होऊन विद्यापीठाचे नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर असे करण्यात आले. या निमित्ताने ‘नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार’ या विषयावर शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी श्री सरोदे मार्गदर्शन करीत होते.
माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्याख्याते म्हणून मानव जोडो संघटनेचे सरचिटणीस रमेशचंद्र सरोदे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य संत विमर्शचे संयोजक डॉ. सुभाष लोहे, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे
यांची उपस्थिती होती.
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कसे मिळाले. या आंदोलनाचा उलगडा श्री रमेशचंद्र सरोदे यांनी पुढे बोलताना केला. राष्ट्रसंतांनी समाजाला दिलेला अनमोल ठेवा असलेल्या ग्रामगीतेचे प्रत्यक्ष अनुकरण करणे मोठे कठीण आहे. याच ग्रामगीतेचे आयुष्यभर अनुकरण करीत आल्याने नामविस्तार लढ्याला यश मिळाल्याचे सरोदे म्हणाले. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वडिलाचा गुरुदेवभक्तीचा वारसा मिळाल्याने राष्ट्रसंतांचे विचार अधिक अंमलात आणता आले. ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून जीवनव्यापन करणे किती कठीण असते, याचे त्यांच्या जीवनातील अनुभव सरोदे यांनी सांगितले. राष्ट्रसंतांचा आदेश समजून गावोगावात नामविस्तार लढा कशाप्रकारे पोहोचविला याची माहिती त्यांनी दिली. नामविस्ताराच्या लढ्यासाठी कोणाकडूनही वर्गणी गोळा केली नाही. वडिलांची पेन्शन तसेच छायाचित्र व्यवसायातून मिळालेले उत्पन्न या लढ्यासाठी खर्ची घातले, असे सरोदे यांनी सांगितले. विद्यापीठ नामविस्तार आंदोलन सुरू असताना आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. सोबतच लढा अंतिम टप्प्यात असताना गुरुकुंज मोझरी येथील संपूर्ण दिवसभर राष्ट्रीय महामार्ग कशाप्रकारे अडवून ठेवला. त्याचप्रमाणे महामार्गावरच जेवणाच्या पंगती कशाप्रकारे चालल्या याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात १३ डिसेंबर २००५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला तर वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विद्यापीठाला देण्यात आले असे ते म्हणाले.
महापुरुषांचे जीवनकार्य सतत प्रेरणा देत राहत असल्याने नामविस्तार करावे लागतात, असे संत विमर्शचे संयोजक डॉ. सुभाष लोहे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. समाज सुधार करण्यासाठी कार्यकर्ता घडावा म्हणून महाराजांनी दैनंदिन प्रार्थनेची सुरुवात केली. संपूर्ण जग वसुधैव कुटुंबकम व्हावे म्हणजेच स्वर्ग सम संसार व्हावा असे वर्णन महाराजांनी प्रार्थनेत केले आहे. भारतीय मनाचा किती विशाल परीघ आहे, याची आठवण रोज रोज सामुदायिक प्रार्थना करून देते. त्याचप्रमाणे संस्कृती, समृद्धी आणि विचाराने समृद्ध अशा प्राचीन भारताचा परिचय महाराजांनी त्यांच्या साहित्यातून करून दिला, असे डॉ. लोहे म्हणाले. अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी महाराजांचे कार्य अतुलनीय आहे. समाजाची रास्त मागणी आणि समाज भावनेचा आदर करीत सरकारने विद्यापीठाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नावविस्तार केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचू शकलो का? याचे आत्मचिंतन करीत ते पोहोचवण्याचे आव्हान आपणासमोर आहे असे डॉ. बोकारे म्हणाले. माहिती व ज्ञानाचे रूपांतर विद्येत होणे गरजेचे आहे. सोबतच राष्ट्रसंतांच्या विचाराकडे वळल्याशिवाय तरणोपाय नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी १३ डिसेंबर रोजी विद्यापीठाचा नामविस्तार झाला. याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले तर आभार डॉ. देवमन कामडी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणीचे सदस्य, अधिष्ठाता, सांविधिक अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यासन विभागातील छाया खोब्रागडे व कल्याणी मेश्राम यांनी प्रयत्न केले.