कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित परिषद
नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन येत्या मंगळवार, दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या नेतृत्व तसेच मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद् आयोजित करण्यात येणार आहे. नेपाळ संस्कृत विद्यापीठातीलमान्यवर विद्वान या परिषदेत सहभागी होणार असून विविध शैक्षणिक कार्यक्रम, प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आदान-प्रदान याकरिता सामंजस्य करारही करण्यात येणार आहे. या परिषदेत भारतीय ज्ञान प्रणाली आधारित शोधनिबंधांची सत्रे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा सर्वस्तरीय समावेश करण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही ज्ञान, विज्ञान आणि प्रत्यक्ष मनुष्य जीवनाशी निगडीत आहे. ही परंपरा नव्या पिढीला समजावी, त्यामागील शास्त्रीय विचार रुजावा आणि त्याबद्दल डोळस अभिमान निर्माण व्हावा हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. भारतीय ज्ञान परंपरेत मानव्यशास्त्रे, विज्ञान, गणित, कृत्रिम बुद्धिमत्ता, अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्र, वैद्यक आणि समग्र स्वास्थ्य उपचार पद्धती, कृषी, सामूहिक विज्ञान प्रणाली, ललित कला तसेच व्यावसायिक कौश्यल्ये यांचा समावेश होतो. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अमलबजावणी तीव्रगतीने सुरू केली आहे . कालिदास संस्कृत विश्वविद्यालयालाही भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित नवीन अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले आहे; हे सर्व अभ्यासकम महाराष्ट्रातील विद्यापीठांत परिचालित करावयाचे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञान प्रणाली आधारित कोणकोणत्या संधी, क्षेत्रे आणि विषय संशोधनासाठी उपलब्ध आहेत याचा सर्वकष विचार करण्याची गरज असून, यावर वैचारिक मंथन आणि ऊहापोह करण्यासाठी ही एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद् आयोजित करण्यात आल्याचे परिषदेचे संयोजक व दार्शनिक तसेच संस्कृत महाकवी प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी सांगितले.
या परिषदेचे उद्घाटन प्रो. रमेश भारद्वाज, मा. कुलगुरू, महर्षी वाल्मिकी संस्कृत विश्वविद्यालय, कैथल, हरियाणा यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान प्रो. हरेराम त्रिपाठी, मा. कुलगुरू, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भूषविणार आहेत. विशेष अतिथी या नात्याने प्रो. माधव अधिकारी, तर सारस्वत अतिथी या नात्याने डॉ. रघुनाथ नेपाळ, दोघेही नेपाळ संस्कृत विद्यापीठ, नेपाळ, डॉ. शिवप्रसाद न्योपाने, प्रो. रंभाकुमारी आर्यल, दोघेही जनता विद्यापीठ, नेपाळ उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय तर संयोजक भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकायाचे अधिष्ठाता प्रो. मधुसूदन पेन्ना आहेत. या परिषदेचे समन्वयक प्रो. कलापिनी अगस्ती, विभागाध्यक्षा, योग विभाग, प्रो. पराग जोशी, विभागाध्यक्ष, आधुनिक भाषा विभाग यांनी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.