राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘लैंगिक समानता व सायबर सुरक्षितता’ या विषयावर जनजागृती
- दत्ता मेघे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मनीषा कोठेकर यांचे प्रतिपादन
- विद्यापीठात लैंगिक समानता व सायबर सुरक्षितता विषयावर जागरूकता कार्यक्रम
नागपूर : नि:पक्षपाती ध्येय भावनेतून लैंगिक समानता येईल, असे प्रतिपादन दत्ता मेघे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मनीषा कोठेकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवार, दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी ‘लैंगिक समानता व सायबर सुरक्षितता’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला. लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कोठेकर मार्गदर्शन करीत होत्या. प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमात अतिथी वक्ता म्हणून कायदेतज्ञ व सायबर सुरक्षितता सल्लागार डॉ. महेंद्र लिमये आणि दत्ता मेघे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मनीषा कोठेकर, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह समिती अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर, रा.से.यो. संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती.

आजच्या काळात आपण मुलगा आणि मुलीला समान मानत असल्याने लैंगिक समानता विषय कालबाह्य झाला असे वाटते. मात्र, लैंगिक समानतेची धारणा योग्यप्रमाणे समजून घेता यावी, यासाठी विषय मांडावा लागत असल्याचे डॉ. कोठेकर पुढे बोलताना म्हणाल्या. लैंगिक पूर्वाग्रह आणि लैंगिक समानता या दोन्ही बाजूने विषय तसेच पुरुषत्व आणि बायकीपण हे जेंडर समजून घेणे महत्त्वाचे आहे. जगातील कोणत्याही देशात समाज आणि संस्कृतीत पुरुष आणि स्त्रिया असा लैंगिक भेद त्यांच्याकडून होत असलेल्या कार्यातून ओळखू शकतो. याबाबत आपले नियम पक्के झाले आहे. प्रत्येक समाजात याबाबत चौकटी निर्माण केल्या जातात हे दोघांसाठीही पक्षपाती असल्याचे डॉ. कोठेकर म्हणाल्या. इक्वालिटी म्हणजेच समानतेची सुरुवात करावी लागेल तेव्हा इक्विटी म्हणजेच ध्येय भाव निश्चित होईल. महिला व पुरुषांची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यावे लागेल. लैंगिक समानतेचा विषय हा पाश्चात् आहे हे आपण आपल्या डोक्यातून काढून टाकले पाहिजे. स्त्री-पुरुषांमध्ये समानता असल्याचे भारतीय प्राचीन साहित्यातून उलगडले आहे. भारतात स्त्री-पुरुष लैंगिक भेदाने वेगळे असले तरी समान असल्याचे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी सांगितले. निसर्गाने दिलेल्या जबाबदारीचा सन्मान करीत दोघांनी एकमेकांना समजून घेत पुढे जायचे आहे, यातच समानतेचे ध्येय असल्याचे डॉ. कोठेकर म्हणाल्या.

विविध स्वरूपात सायबर क्राईम – डॉ. महेंद्र लिमये
आज विविध स्वरूपात सायबर गुन्हे समोर येत असून आमिष दाखविल्या जाते तेव्हाच सावधान होणे गरजेचे असल्याचे कायदेतज्ञ व सायबर सुरक्षितता सल्लागार डॉ. महेंद्र लिमये यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार स्त्री-पुरुष असा भेद करीत नाही. सायबर गुन्हेगार आभासी पद्धतीने हल्ला करतात. आवाज ओळखून फसवणूक करण्याची पद्धत शोधतात. डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करणे अपरिहार्य झाले आहे. अशा स्थितीत समाज माध्यम अथवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करताना जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल प्रणालीबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने फसवणुकीचे प्रकार घडतात. देशात समाज माध्यमांची सेवा देणाऱ्या कंपन्या कोणतेही शुल्क आकारत नाही. कंपन्या मात्र कर्मचाऱ्यांना मोठे वेतन देते. त्यांच्याकडे यासाठी पैसे येतात तरी कुठून असा प्रश्न डॉ. लिमये यांनी उपस्थित केला. आपण मोबाईलमध्ये विविध अप्लिकेशनचा वापर करीत असताना नकळतपणे आपली माहिती वापरण्याची परवानगी देतो. हीच माहिती सेवा पुरवठादार अन्य कंपन्यांना विकतात तेथूनच फसवणुकीचा हा प्रकार सुरू होतो, असे डॉ. लिमये म्हणाले. मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना ‘डिजिटल अरेस्ट’ हा नवीन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कोणीही तुम्हाला डिजिटली अटक करू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे अशाप्रकारे सायबर गुन्हेगार तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यापुढे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या माध्यमातून फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. समाज माध्यम तसेच डिजिटल व्यवहार करताना जागरूकता बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समानतेबाबत मानसिकतेची गरज – डॉ. राजेंद्र काकडे
अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी लैंगिक समानतेसाठी मानसिकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. कुटुंबातील दैनंदिन कामापासून लैंगिक समानतेबाबत मानसिकता निर्माण करता येते, असे त्यांनी सांगितले. सोबतच ऑनलाईन फसवणुकीबाबत सर्वांनी जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काळजी घेतली तर सुरक्षित राहू शकतो. आमिषाला बळी पडलो तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन डॉ. काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी लिहितकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. आपले जीवन नवनवीन तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपामुळे विचलित होत असून सायबर तंत्रज्ञानाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आपला देखील वाटा असावा म्हणून विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता समितीचे सदस्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. वंदना धवड, डॉ. राजेंद्र ऊतखेडे, डॉ. मंजुषा जोशी, माधुरी साकुलकर यांच्यासह अन्य सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणीचे सदस्य, सांविधिक अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.