प्रोजेक्ट आयटूआय अंतर्गत मोफत ४ आरोग्य शिबिरांचे आयोजन ; एमजीएम आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांचा संयुक्त उपक्रम
आयटूआय
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एमजीएम विद्यापीठ आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट आयटूआय’ या विशेष उपक्रमांतर्गत बाजार सांगवी, वरूड काझी, वाळुंज आणि फुलंब्री या चार ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ४ विशेष शिबिरांमध्ये पहिले शिबिर मंगळवार, दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी बाजार सांगवी, दुसरे शिबिर बुधवार, दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी वरूड काझी, तिसरे शिबिर शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी वाळुज येथे तर चौथे शिबिर शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी फुलंब्री येथे होणार आहे. सर्व शिबिरांसाठी सर्वांना खुला प्रवेश असणार असून सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांची मोफत तपासणी येथे होणार आहे.
या सर्व शिबिरांमध्ये सिंगापूर येथून आलेल्या शिष्टमंडळातील प्रोजेक्ट आयटूआयचे संचालक डॉ.रुपेश अगरवाल, डॉ.सतीश रामपटना, डॉ.रोहित अगरवाल यांच्यासह नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे २८ विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर, विद्यार्थी आणि सिंगापूरवरून आलेले शिष्टमंडळ हे रुग्णांची तपासणीसह उपचार करणार आहेत.
या शिबिरामध्ये स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग विभाग, वैद्यकशास्त्र विभाग आदि विभाग सहभागी होत असून या संबंधित विभागातील तज्ञ डॉक्टर्स यावेळी उपचार करणार आहेत. या शिबिरामध्ये जे मोतीबिंदूचे रुग्ण आढळतील अशा सर्व रुग्णांवर एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सर्व शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्र विभागप्रमुख डॉ.सारिका गाडेकर यांनी केले आहे.