एमजीएम विद्यापीठाच्या प्रा डॉ योगिता महाजन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
‘थिएटर फॉर यंग माईंड्स गोल्डन मॅजिक ऑफ थिएटर पेडागॉजी’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्समध्ये कार्यरत असणाऱ्या प्रा डॉ योगिता महाजन यांच्या ‘थिएटर फॉर यंग माईंड्स गोल्डन मॅजिक ऑफ थिएटर पेडागॉजी’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते एमजीएम ट्रस्ट कार्यालयात संपन्न झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, प्रा डॉ शर्वरी तामणे, प्रा डॉ आर आर देशमुख, प्रा डॉ कपिलेश मंगल व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, प्रा योगिता महाजन या एक कलावंत, प्राध्यापक म्हणून सर्वांना परिचित आहेत मात्र, आता त्या लेखिका म्हणून ही आपले नावलौकिक करतील असा विश्वास मला वाटतो. नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईस हे पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल. प्रा महाजन यांच्या पुढील लेखन कार्यास माझ्याकडून शुभेच्छा!
‘थिएटर फॉर यंग माईंड्स गोल्डन मॅजिक ऑफ थिएटर पेडागॉजी’ हे पुस्तक शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये मार्गदर्शन करणारा एक मौल्यवान स्रोत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून योगिता महाजन यांनी सिद्धांत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील अंतर अचूकपणे भरून काढले आहे आणि प्राथमिक शिक्षणामध्ये नाट्य शिक्षणाचा समावेश करण्यासाठी एक मार्गदर्शक मार्ग तयार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना मिळते. हे पुस्तक शिक्षक, शिक्षणतज्ञ तसेच बाल शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींसाठी महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन लेखिका प्रा डॉ योगिता महाजन यांनी यावेळी केले.
प्रा डॉ योगिता महाजन या अनुभवी नाट्य कलाकार आहेत. त्यांनी नाट्य शिक्षणामध्ये पीएच डी प्राप्त लेली असून त्यांनी परफॉर्मिंग आर्ट्स, मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझममध्ये आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून सुवर्ण महोत्सवी फेलोशिप मिळालेली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये यशस्वीरित्या आपले संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्या गेल्या दोन दशकापासून मुलांसोबत नाट्य क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी ६० हून अधिक नाटकांमध्ये अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
या पुस्तकात परिचय, भारतीय शिक्षण पद्धती आणि शिक्षणामध्ये नाट्य शिक्षणाची गरज, नाट्य शिक्षणाची रचना आणि विविध विषयांमध्ये त्याचा समावेश, नाट्य शिक्षणातील नवीन रणनीती आणि त्याच्या अनुप्रयोगाचे महत्त्व: सुधारणा आणि सादरीकरण,अभ्यासक्रमामध्ये गोष्टी सांगण्याच्या विविध पद्धतींचा वापर, अभ्यासक्रमामध्ये भूमिका निर्मिती तंत्राचे महत्त्व, नाट्य शिक्षण/शिक्षणातील नाट्य या संकल्पनेचे प्रवर्तक, नाट्य शिक्षणाच्या अंमलबजावणीनंतरचे परिणाम: तथ्ये, निष्कर्ष आणि परिणाम अशी एकूण ८ प्रकरणे आहेत.