नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास आणि उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान उत्साहात संपन्न
जगातील प्रत्येक सांस्कृतिक मानवतेला महत्त्वाचे स्थान – साउथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिका येथील प्रो. यशवंत विष्णुपंत पाठक यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘सर्व भवन्तु सुखते’ या तत्त्वाला अनुसरून जगातील प्रत्येक सांस्कृतिक मानवतेला महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन साउथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिका येथील प्रो यशवंत विष्णुपंत पाठक यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभाग आणि उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी प्रो पाठक मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. यावेळी व्याख्याते म्हणून साउथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिका येथील प्रो यशवंत विष्णुपंत पाठक, आयसीसीएसचे राष्ट्रीय समन्वयक डॉ संदीप कवीश्वर, उर्दू विभाग प्रमुख डॉ संतोष गिरहे यांची उपस्थिती होती. ‘शाश्वत समृद्धीचा मूळ मंत्र: भारतीय संस्कृती आणि वसुधैव कुटुंबकम्’ या विषयावर पुढे बोलताना प्रो यशवंत पाठक यांनी वर्तमान काळात आजच्या पिढीने प्रत्येक सांस्कृतिक मानवतेची जोपासना करायला हवी आणि या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाने एकमेकाचा आदर सन्मान करावा, असे आवाहन केले. त्यातून बंधुभाव निर्माण होईल. जग समृद्ध आणि शांतीकडे वाटचाल करेल, असे ते म्हणाले. विश्वातील संपूर्ण मानव जातीने आपण एक आहो ही भावना जोपासावी यामुळे येणाऱ्या समस्यांना सामूहिकरीत्या सामोर जाता येतील, असे पाठक म्हणाले.
प्रो पाठक यांनी आपल्या भाषणात जगातील अनेक प्राचीन संस्कृतींचे दाखले दिले. त्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या चांगल्या चालीरीतीमुळे वर्तमान काळातील माणूस योग्य प्रकारे जीवन व्यतीत करू लागला. युरोपातल्या प्राचीन संस्कृती विषयी सविस्तर विवेचन केले. मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुसंस्कृत करण्यात आपले जीवनमूल्य फार महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृतीत आपण नद्यांना मातेची उपमा दिली आहे. तसेच मानवी जीवनात नद्यांचे फार महत्त्वाचे स्थान आहे. नद्यांना पूजनीय मानून माणूस नदीशी एकरूप होऊन एक निसर्ग संपन्न जीवन जगत आलेला आहे. मानवाने निसर्गाशी जुळवून घेऊन, त्याच्याशी एकरूप होऊन ,समतोल साधून, नैसर्गिक जीवन पद्धती अमलात आणायला हवी. प्रत्येक मानवाने आपण एका मातेचे मूल होऊनच जगावे. त्यामुळे बंधुभाव टिकून राहील तसेच प्रत्येकाने स्वतःपुरता मर्यादित विचार न करता दुसऱ्याची काळजी घ्यावी यातून अखिल मानवतावादाला प्रोत्साहन मिळेल आणि वसुधैव कुटुंबकम खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, असे प्रो. पाठक म्हणाले. प्रो. पाठक हे विद्यापीठाच्या औषधी निर्माण शास्त्र विभागाचे १९७७ च्या बॅचचे एमफॉर्मचे विद्यार्थी आहे. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना बराच उजाळा दिला.
व्याख्यान सत्राला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आयसीसीएसचे राष्ट्रीय समन्वयक डॉ संदीप कवीश्वर यांनी आपल्या मनोगत अखिल मानवतेला एका उंचीवर नेण्याकरिता आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल, असे सांगितले. निसर्गाशी समतोल साधून निसर्गाशी पूरक जीवनशैली बनवावी लागेल. वर्तमान काळात आपण आपल्या जीवन मूल्यांपासून दूर चाललो आहोत याची जाणीव त्यांनी करून दिली. निसर्गाशी एकरूप होऊन एक नवी जीवनशैली अंगीकारावी लागेल. या पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाची ही जबाबदारी राहील की निसर्गाने दिलेल्या साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर व्हावा. तसेच लहानातल्या लहान गोष्टीचा सन्मान करायला शिकले पाहिजे तरच आपण समृद्धीकडे वाटचाल करू असे ते म्हणाले.
मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मानव मानवात बंधुभाव निर्माण व्हावा. संपूर्ण मानवी समाज एक आहे. या भावनेची जोपासणूक व्हावी तरच आपण शाश्वत जीवनाकडे वाटचाल करू, असे सांगितले. प्रत्येकाच्या मनात पृथ्वीतलावरील प्राणीमात्रांबाबत दयाभाव असावा, असा ममतेचा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्दू विभाग प्रमुख डॉ संतोष गिरहे यांनी केले. संचालन डॉ रामभाऊ कोरेकर यांनी केले, तर आभार डॉ समीर कबीर यांनी पार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास आणि उर्दू विभागातील प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.