अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 70 वे राष्ट्रीय अधिवेशन गोरखपूर उत्तर प्रदेश येथे संपन्न
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती चिंताजनक- अभाविप
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ७० वे राष्ट्रीय अधिवेशन २२, २३ व २४ नोव्हेंबर २०२४ रोजी गोरखपुर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाले ज्यात राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. राजशरण शाही यांचे पुनर्निर्वाचन तर राष्ट्रीय महामंत्री म्हणून डॉ. वीरेंद्रसिंह सोलंकी यांचे नवनिर्वाचन करण्यात आले. या अधिवेशनामध्ये देशभरातून एकूण १२७८ प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रदेशातुन एकूण २४ प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनात उद्घाटक म्हणून झोहो या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सी.ई. ओ. सुप्रसिद्ध उद्योजक पद्मश्री.श्रीधर वेंबु उपस्थित होते. तसेच प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार श्रवण बाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणारे श्री. दिपेश नायर (ठाणे) यांना देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
या अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करण्यात आले. ज्यांच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येणाऱ्या वर्षभरामध्ये कार्य करेल, तसेच याचा पाठपुरावा घेईल. यामध्ये मणिपूर येथे होणाऱ्या हिंसाचारात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, शिक्षण संस्थानांची ढासळती गुणवत्ता, शैक्षणिक संस्थानांच्या अनुचित शुल्क वृद्धीवर नियंत्रण, महाविद्यालयांमध्ये वाढते रसायन युक्त व प्रक्रिया युक्त खाद्यपदार्थ चिंताजनक या ऐवजी जैविक भोजनाचा आग्रह तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सफल कुटनीती या विषयात प्रस्ताव पारित करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची २०२३-२४ ची सदस्यता ५५,१२,४७० इतकी झाली असे निवर्तमान महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी सांगितले. या अधिवेशनात गोरखपुरमध्ये अभाविपच्या माध्यमातून लघु भारताचे दर्शन घडले यामध्ये यामध्ये पूर्वांचल पासून कश्मीर पर्यंतचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रात उद्भवणारी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती या विषयात अभाविप शैक्षणिक परिसरामध्ये सर्वेक्षण करणार आहे व विद्यार्थ्यांमध्ये रोजगार आणि उद्योजकता या विषयांवर अनेक व्याख्यानांचे आयोजन करणार आहे. यावेळी पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपूडे,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कु.निकिता डिंबर हे उपस्थित होते.