शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा
दि. १ डिसेंबर २०२४ रोजी अनावरणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने या पुतळ्याची थोडक्यात माहिती…
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवाजी विद्यापीठासमोरील वर्तुळ उद्यानात बसविण्यात आलेला पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा हा देशातील सर्वाधिक देखण्या शिल्पाकृतींपैकी एक आहे. कोल्हापूर शहराच्या अस्मितेचा मानबिंदू म्हणून हा पुतळा आणि त्यामागील शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीकडे पाहिले जाते. शहरातील सर्वाधिक छायाचित्रे काढल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी असणारे हे एक महत्त्वाचे ऊर्जास्थान आहे.
हा पुतळा उभारण्यासाठी सन १९७० मध्ये वृत्तपत्रांतून जाहीर प्रकटीकरण देण्यात आले. त्यानुसार पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई आदी ठिकाणच्या प्रख्यात शिल्पकारांनी पुतळ्याची मॉडेल्स विद्यापीठाकडे पाठविली. अंतिमतः पुण्याचे शिल्पकार श्री. बी.आर. खेडकर यांच्या मॉडेलची निवड करण्यात आली. अश्वारुढ पुतळ्याचे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी खेडकरांनी पुण्याच्या रेसकोर्सवर धावणाऱ्या घोड्यांचे बारकाईने निरीक्षण केले. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी पुण्यातील मिलीटरी प्रिपरेटरी स्कूलमध्ये एक घोडा आणि स्वार आणून त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करवून घेतली. धावत्या घोड्याचा लगाम खेचल्यानंतर त्याची मान कशी असेल, मागील पायाचे स्नायू कोठे आणि कसे ताठर होतील, हे त्यांनी खेडकरांना दाखविले. त्याचप्रमाणे शिवरायांची भावमुद्रा, आभूषणे, पोषाख आदींविषयीही सूचना केल्या. सन १९७१मध्ये प्रत्यक्ष पुतळ्याच्या कामास सुरवात होऊन तीन वर्षांत पुतळा पूर्ण झाला. पुतळ्याचे विविध भाग पुण्याहून आणून ते जोडण्याचे काम खेडकर यांनी पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले. पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम कांचीपुरम् येथील डॉ. अमरेंद्र कुमार यांनी केले असून त्यासाठीचा गुलाबी ग्रॅनाईट दगड आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधून आणण्यात आला. तमिळनाडूमधून कारागीर आणून चौथऱ्याचे काम करण्यात आले आहे.
या पुतळ्याच्या उभारणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, दूधगंगा-वेदगंगा, कुंभी-कासारी, वारणा आणि पंचगंगा या सहकारी साखर कारखान्यांचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्यासह विद्यापीठाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिक यांनी उदारहस्ते देणगी दिली. कारखान्यांनी प्रत्येकी रु. ६०,००० आणि विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांकडून रु. ६६,५९० अशी एकूण रु. ३,६६,५९० इतकी देणगी प्राप्त झाली. त्या देणगीतून हा पुतळा उभारण्यात आला आहे.
पुतळ्याची थोडक्यात माहिती
पुतळ्याचा अनावरण दिनांक: १ डिसेंबर १९७४ (शिवशक ३०१, कार्तिक व।। २ शके १८९६)
हस्ते: मा. ना. श्री. यशवंतराव बळवंतराव चव्हाण, तत्कालीन परराष्ट्र मंत्री, भारत सरकार
शिल्पकार: बी.आर. खेडकर, पुणे
केवळ पुतळ्याची उंची: १८ फूट ६ इंच
चौथऱ्याची उंची: १८ फूट
चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची: ३६ फूट ६ इंच
पुतळ्याची लांबी: २० फूट
पुतळ्याचे वजन: आठ टन (संपूर्णपणे ब्राँझ धातूमधील घडण)
पुतळ्याभोवतीच्या वर्तुळ उद्यानाचे क्षेत्रफळ: २.१३ एकर