एमजीएम विद्यापीठाची AI अँकर आर्या
एमजीएममध्ये एआय अँकर आर्या‘ने करून दिली पाहुण्यांची ओळख
विद्यापीठाच्या युडीआयसिटी विभागाचा अभिनव उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, दि. २० : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात जगभरात कृत्रिम बुद्धिमतेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI) वापर सगळीकडे होताना दिसत आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वर्धापन दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठ, आंध्रप्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.टी. व्ही.कट्टीमनी यांची ओळख एआय अँकर आर्या हिने करून दिली. अशा प्रकारची एआयच्या माध्यमातून पाहुण्यांची ओळख करून देण्याचा प्रयोग विद्यापीठात पहिल्यांदाच झाला आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत हा अभिनव प्रयोग करण्यात आला. या एआय अँकर आर्याची निर्मिती विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांघिक प्रयत्नातुन केली असून त्यांना विभागप्रमुख डॉ. शर्वरी तामणे यांचे मार्गदर्शन लाभले. या एआय अँकर आर्याची निर्मितीच्या प्रकल्पाचे नेतृत्व तृतीय वर्षात शिकणाऱ्या प्रियेश या विद्यार्थ्याने केले. विद्यापीठात झालेला हा एआय अँकरचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल सर्व स्तरातून विभागाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सिक्युअर्ड इंडियाच्या सहकार्याने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेंसिक्स’ केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी उपाय शोधणे, स्टार्टअप निर्मितीला प्रोत्साहन देणे, नावीन्यपूर्ण कल्पनांसह सरकारी आणि खाजगी संस्थांशी जोडले जाणे, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्या सोडविणे, सर्वांना खुले प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपलब्ध करून देणे अशा विविध प्रकारचे काम या केंद्राच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. शर्वरी तामणे यांनी दिली.