दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात संविधान दिन साजरा
संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध व्हावे– कुलगुरू डॉ. वाघमारे
वर्धा – प्रत्येक विद्यार्थ्याने संविधान उद्देशिकेचे वाचन करावे व संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असावे, असे आवाहन सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी संस्थांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघाद्वारे आयोजित ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीला संबोधित करताना केले.

कर्मचारी संघाद्वारे आयोजित या संविधान दिन यात्रेची सुरुवात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातून करण्यात आली. यावेळी, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी संविधान दिन हा भारतीयांचा राष्ट्रीय उत्सव असून प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करीत नव्या पिढीत ती रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. प्रारंभी संयोजक डॉ अमोल लोहकरे यांनी आपले संविधानिक अधिकार आणि कर्तव्ये याविषयी माहिती दिली. तर डॉ. उल्हास जाधव यांनी, भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून त्याचे सर्वांनी वाचन करावे, असे सांगितले. याप्रसंगी सावंगी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ही संविधान यात्रा जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, शरद पवार दंत महाविद्यालय अशी परिक्रमा करीत अभिमत विद्यापीठ परिसरात आली असता कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे व कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी संविधान दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमांची डॉ. श्वेता पिसूळकर यांनी माहिती दिली. या रॅलीची सांगता सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रांगणात करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात डॉ. उल्हास दुधेकर यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. तर, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक व राष्ट्रीय हितासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र आगलावे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनात किशोर पोपटकर, प्रवीण सुटे, संगीता कांबळे, श्रावण पोपटकर, राजू ताकसांडे, राजू राजुरकर, गौतम आगलावे व कर्मचारी वृंदाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.