यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे संशोधन निबंध लेखन कार्यशाळेचा समारोप
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय राष्ट्रीय स्तरावरील संशोधन निबंध लेखन (Research Paper Writing Workshop) कार्यशाळा संपन्न झाली. विद्यापीठाच्या प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र तसेच स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग यांच्या मार्फत ‘यश इन’ सभागृहात दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा १३० हून अधिक संशोधक विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक – प्राचार्य यांनी लाभ घेतला.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले तर समारोप हा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका तथा व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आपल्या उद्घाटनपर अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी नवोदित संशोधक विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक व बौद्धिक फसवणूक टाळण्यासाठी केवळ विद्यापीठ अनुदान आयोग (यु. जी. सी.) मान्यताप्राप्त मासिकांमध्येच आपले संशोधन लेख प्रकाशित करण्यासाठी पाठवावेत असे आवाहन केले. कार्यशाळा समारोपाच्या भाषणात विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका तथा व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले यांनी नवोदित संशोधक विद्यार्थी आणि त्याचबरोबर शिक्षक – प्राध्यापक यांच्यासाठी देखील अशा प्रकारच्या कार्यशाळा या उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल प्रा. राजेंद्र कुंभार यांनी ‘संदर्भ शैली आणि साहित्यचौर्य’ (Referencing Styles & Plagiarism) या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शासनाने तरतूद केलेल्या संशोधना निधीचा सदुपयोग संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन नवनिर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. सोलापूर येथील डी. बी. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर यांनी ग्रंथसूची व संकेतस्थळ सूची (बिब्लिओग्राफी व वेब्लीओग्राफी) याविषयी उपयुक्त माहिती दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक प्रा. व्ही. बी. गायकवाड यांनी ‘उद्धरण, एच इंडेक्स, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मासिके / जर्नल (स्कोपस/डब्ल्यूओएस) मधील प्रकाशन आणि त्या प्रकाशकांसोबतचा संवाद’ (Citations, H Index, Publications in Reputed International Journal (Scopus/WoS) & Communication with the Publisher) याविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमता (ए. आय.) याविषयी देखील उपयुक्त माहिती दिली. विद्यापीठाच्या प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र तसेच स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगच्या संचालिका इमरटस प्रा. डॉ. कविता साळुंके यांनी संशोधन निबंध लेखन कार्यशाळेची गरज, महत्व, संशोधन निबंध लिहिताना घ्यावयाची काळजी, होणाऱ्या चुका, त्यातील बारकावे या संदर्भात माहिती दिली. तसेच सदर कार्यशाळेची उद्दिष्टे व स्वरूप त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथील एस. एन. डी. टी विद्यापीठाच्या डॉ. सारिका सावंत यांनी ‘शोधनिबंध लिहिण्याची सिद्धता व तयारी’ (Mechanism of Writing Research Paper) याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संशोधन कार्य व संशोधन लेखामुळे खरा संशोधक ओळखला जातो अशी पुस्ती त्यांनी जोडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वैभव जाधव यांनी “संशोधन लेख लिहिताना संशोधकाने पाळावयाची नैतिकता आणि नीतिमूल्ये” या बाबत मार्गदर्शन केले. चॅट जीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संशोधक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांच्यापुढे नवीन आव्हाने निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबई येथील एस. एन. डी. टी विद्यापीठाच्या डॉ. ज्योती भाबळ यांनी ‘शैक्षणिक लेखनात ज्ञान स्त्रोत केंद्रांचा वापर’ (Use of Knowledge Resource centers in academic writing) या विषयावर बोलतांना वाचनालय चळवळीतील अद्यावत तंत्रज्ञान, उपक्रम व योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सह्भागींपैकी संशोधकांपैकी श्री. राहुल गायकवाड, श्रीमती अनुराधा पंडित, श्रीमती जागृती चव्हाण, राजकुमार ननावरे यांनी कार्यशाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी या कार्यशाळेमुळे संशोधन लेख विकसित करताना आवश्यक असणाऱ्या अनेक नवीन बाबींचे ज्ञान प्राप्त झाले, अनेक नवीन व तांत्रिक संकल्पना शिकायला मिळाल्या, असे मत व्यक्त केले.
विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड यांच्या नियोजनाखाली ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेच्या सर्व सत्रांचे सूत्रसंचालन डॉ. वसुदेव राऊत आणि डॉ. विद्यादेवी बागुल यांनी केले. डॉ. सचिन पोरे यांनी संयोजन केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रकाश सापनर, सचिन कटारे, किरण राउत, बाळू साबळे, देवयानी वारुंगसे,विजय भाकरे, घनशाम पाटील, हरीश काळे, राधिका शिंदे, कु. गौरी रावडे, ऋतिक घुगे, तन्मय बोरसे यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी दिली.