राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
भारताचे संविधान महान – डॉ सच्चिदानंद फुलेकर
नागपूर : जगात सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताचे संविधान महान असून त्याला समजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ सच्चिदानंद फुलेकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ फुलेकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ राजू हिवसे, व्याख्याते म्हणून डॉ सच्चिदानंद फुलेकर, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे मार्गदर्शन करताना डॉ फुलेकर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि तत्कालीन परिस्थितीची माहिती दिली.
मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर येण्याकरिता निवडणुकीत कशाप्रकारे पराभवाचा सामना करावा लागला. घटना समितीवर आल्यानंतर समितीचे प्रभारी अध्यक्ष सचिदानंद सिन्हा यांनी बोलण्याची संधी दिल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्याच भाषणात सर्वांची मने जिंकून घेतली. अत्यंत कमी कालावधीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले तसेच जाती- धर्म आदी विविधता असलेल्या भारताचे लिखित संविधान तयार केल्याची माहिती दिली.
आज या घटनेला ७५ वर्ष होत असून संपूर्ण देशात अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समानता, बंधुता आदी विविध प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहे. भारतीय संविधानात देशातील प्रत्येक घटकाबाबत विचार करण्यात आला असून त्यामुळे संविधानाचे विचारपूर्वक अध्ययन केले पाहिजे असे डॉ फुलेकर म्हणाले. सोबतच त्यांनी संविधानाविषयी विस्तृत माहिती दिली. अध्यक्षीय भाषण करताना अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भारत देश हा विविधतेने नटलेला असून येथील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न संविधानाने केला आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकेच्या सुरुवातीलाच असलेला ‘आम्ही भारताचे लोक…’ हा शब्द अनेक चर्चा मतदानानंतर स्वीकारण्यात आला असे त्यांनी यावेळी सांगितले. सव्वाशे पेक्षा अधिक दुरुस्त्या झाल्या असल्या तरी मूळ घटनेला कोणी हात लावू शकत नाही, हे संविधानाचे वैशिष्ट्य आहे. सोबतच संविधान हे भारताचे सामर्थ्य असल्याचे डॉ कोरेटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारणींचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, सांविधिक अधिकारी, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.