संविधान कला महोत्सवात विद्यार्थ्यांना अधिकारांची जागरूकता वाढवण्याचे नागपूर विद्यापीठाचे आवाहन
संविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत जागरूक व्हा – विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांचे आवाहन
ललित कला विभाग व छंद मंदिर येथे संविधान कला महोत्सव
नागपूर : भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत जागरूक होण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक तथा विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग व छंद मंदिर आणि संकल्प शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान कला महोत्सव रविवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी ललित कला विभाग येथे पार पडला. या कला महोत्सवाचे उद्घाटन करताना डॉ खंडाळ मार्गदर्शन करीत होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाला महोत्सवाचे समन्वयक ललित कला विभाग प्रमुख डॉ संयुक्ता थोरात व संकल्प शिक्षण संस्था नागपूरचे संचालक डॉ प्रशांत तांबे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ खंडाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेल्या अधिकाराची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
संविधान प्रास्ताविकेबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. सोबतच विद्यापीठाच्या वतीने आयोजित होत असलेल्या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळत असल्याची माहिती दिली. संविधान कला महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला व पथनाट्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ प्रशांत तांबे यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधान निर्मितीच्या इतिहासाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या समन्वयक तथा ललित कला विभाग प्रमुख डॉ संयुक्ता थोरात यांनी भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन होत असल्याचे सांगितले.
संविधान कला महोत्सवाच्या निमित्ताने चित्रकला व पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत १० ते १२ या वयोगटात स्निती नितीन पाटील हिने प्रथम क्रमांक, भावेश एस रायबोले याने द्वितीय तर अभिनय अंबोडे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. १३ ते १५ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक आनंदीता, द्वितीय क्रमांक अनुराग डी वरघणे तर तृतीय क्रमांक युगांत एस. रायबोले याने प्राप्त केला. १६ वर्षे वरील वयोगटाच्या स्पर्धेत दिव्या प्रकाश चव्हाण हिने प्रथम क्रमांक, प्रांजू झाडे हिने द्वितीय तर गुंजन ठाकरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेत तीनही वयोगटात एकूण ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पथनाट्य स्पर्धेत बॅरि शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयाच्या चमूने प्रथम क्रमांक तर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पथनाट्य स्पर्धेत ७ संघांनी सहभाग घेतला होता.
पुरस्कार वितरण समारंभ जबलपूर येथील माजी विभागीय आयुक्त समान शेखर तसेच विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ सदानंद चौधरी, विजय जथे व हर्षद सालपे यांनी कार्य बघितले. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण विजय जथे, हर्षद साल्पे व पियुष धुमकेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचा ललित कला विभाग व छंद मंदिर संकल्प शिक्षण संस्था नागपूर तसेच मुव्हमेंट २१ चे सदस्य शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.